बंगळुरुतील आलिशान हॉटेल्सना बॉम्बने उडवण्याची धमकी

| बंगळुरू | वृत्तसंस्था |

बंगळुरूमधील काही मोठ्या आणि आलिशान हॉटेल्सना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या आल्या आहेत. ईमेलद्वारे या धमक्या आल्याची माहिती समोर आली आहे. बंगळुरूतील इलेक्ट्रॉनिक सिटीमधील पंचतारांकित ओटेरा हॉटेलसह एकूण तीन हॉटेल्सना बॉम्बच्या धमकीचे ईमेल आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी दोन वाजता ईमेलमार्फत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली. मात्र, हॉटेल कर्मचाऱ्यांनी रात्रभर ईमेल पाहिलाच नाही. गुरुवारी सकाळी ईमेल पाहिल्यावर हा प्रकार समोर आला. या धमकीला घाबरून हॉटेल प्रशासनाने पोलीस आणि बॉम्बशोधक पथकाला यासंदर्भात माहिती दिली. बॉम्बशोधक पथक आणि पोलीस सध्या ओटेरा आणि इतर हॉटेलमध्ये आहेत. पोलिसांकडून याप्रकरणी कसून तपास सुरू आहे. दरम्यान, याआधीही अनेकवेळा दिल्लीसह देशातील इतर अनेक ठिकाणी शाळा, हॉटेल्स आणि सरकारी मंत्रालयांच्या इमारतींमध्ये बॉम्ब ठेवण्याच्या धमक्या ईमेलद्वारे देण्यात आल्या होत्या. काही काळापासून, दिल्ली, बंगळुरू, अहमदाबाद, जयपूर आणि लखनौ सारख्या शहरातील शाळा आणि रुग्णालयांना धमकीचे ई-मेल येत होते. तसेच दिल्ली, मुंबई, गोवा, नागपूर आणि कोलकाता विमानतळावरील विविध सरकारी इमारतींना परदेशी नागरिकांकडून धमकीचे मेल पाठवण्यात आले होते.

Exit mobile version