| मुंबई | वृत्तसंस्था |
अवघ्या देशाच लक्ष लागलेल्या अंबानी परिवारातील अनंत आणि राधिका यांचा लग्नसोहळा मोठ्या धुमधडाक्यात आणि व्हीआयपींच्या मेळ्यात संपन्न झाला. सोहळ्याकडे जेवढे आवडीने पाहिले जात होते, तितकेच या लग्नसोहळ्याच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्थाही तैनात होती. त्यामुळे, या सोहळ्यासंदर्भातील प्रत्येक गोष्टींवर पोलिसांची करडी नजर होती. त्यावरुन, पोलिसांनी गुजरातच्या वडोदरा येथून एकास अटक केली आहे. अनंत अंबानी यांच्या लग्नसोहळ्यात बॉम्बस्फोट होणार अशा आशयातील धमकीचे ट्विट या युवकाने केले होते.
अनंत अंबानी यांच्या लग्नसोहळ्यात बॉम्बस्फोट होणार अशा आशयाचे ट्विट एका 32 वर्षीय इंजिनिअर तरुणाने केले होते. मुंबई पोलिसांनी गुजरातच्या वडोदरामधून या युवकास अटक केली असून अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव विरल शहा असे आहे. आरोपी विरल हा 32 वर्षांचा असून व्यवसायाने इंजिनिअर आहे. अंबानींच्या लग्नसोहळ्यात सगळे व्हीआयपी एकाच ठिकाणी असून बाँबस्फोट होणार, असे ट्विट आरोपी शहा याने केले होते. या ट्विटनंतर सुरक्षा यंत्रणा अलर्ट झाल्या होत्या, आणि संबंधितावर गुन्हा दाखल करुन आरोपीच्या मागावरही होत्या. अखेर गुजरातच्या वडोदरामधून आरोपीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. याबाबत अधिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे.