शालेय गरजू विद्यार्थ्यांसाठी पुस्तक पेढी

तरुण पदाधिकार्‍यांची संकल्पना; आर्थिक दुर्बल घटकांना शालेय साहित्य उपलब्ध

| नवी मुंबई । प्रतिनिधी ।

विविध राजकीय पक्षाच्या काही तरुण पदाधिकार्‍यांनी मिळून पुस्तिका पेढी हि संकल्पना प्रत्यक्षात उतरवली आहे. आर्थिक दृष्ट्या दुर्बल आणि गरजु  घटकांना शालेय साहित्य आणि पाठ्य पुस्तक वितरण करण्याच्या योजनेचा प्रारंभ मंगळवारी  करण्यात आला. पहिल्याच दिवशी या उपक्रमात अनेक विद्यार्थ्यांनी आपली पुस्तके या योजनेसाठी दान स्वरूपात दिली.

नवी मुंबई शहरातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन नवी मुंबई पालक संघर्ष कृती समिती स्थापन केली आहे. या समितीमार्फत नेहमीच अनेक उपक्रम राबविले जातात. आता ही गरीब गरजु व आर्थिक दुर्बल घटकांना शालेय साहित्य आणि पाठ्य पुस्तक निःशुल्क दिली जाणार आहेत. या पुस्तक पेढीची सुरुवात तुर्भे येथे करण्यात आली. यामध्ये बाळासाहेब शिंदे, विकास सोरटे, समीर बागवान हे प्रमुख संयोजक असून तुर्भे येथे पहिल्याच दिवशी सुमारे पंचवीस विद्यार्थ्यांनी आपली पुस्तके जमा केली असून, आता ही पुस्तके गरजू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे.

11 एप्रिल ते 10 मे पर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे. ज्या पालकांना विद्यार्थ्यांना या योजनेत सहभाग द्यायचा/घ्यायचा असेल त्यांनी संस्थेच्या कार्यालयात सकाळी 11 ते 5  या वेळात संपर्क साधण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे. तसेच सुस्थितीतील पाठ्यपुस्तके, शाळेचे गणवेश किंवा शालेय उपयोगी वस्तु (स्टेशनरी जसे पेन, पेन्सिल आदी साहित्य) गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. असे जाहीर आवाहन करण्यात आले आहे. गणवेश आणि पुस्तके चांगल्या स्थितीतील असावीत जेणेकरून ज्यांना हे साहित्य दिले जाईल त्याचा सन्मान दुखावला जाणार नाही याची काळजी घ्यावी, असेही आवाहन केले आहे.
संपर्क :- युनिट नंबर 4 तळ मजला, अनेक्स कॉम्प्लेक्स, प्लॉट नंबर 9/10, दाणा मार्केट फेज -2, गेट नंबर 3 समोर, करुर वैश्य बँकेशेजारी, सेक्टर 19 तुर्भे, नवी मुंबई-400706.

Exit mobile version