। रसायनी । वार्ताहर ।
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सोमवारपासून फ्रंट लाईन वर्कर आणि 60 वर्षांवरील सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांना कोव्हिड लसीची प्रतिबंधात्मक मात्रा अर्थात बुस्टर डोस सुरू करण्यात आला आहे. संपूर्ण देशात कोरोना तथा ओमायक्रोनचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता शासनाच्या आदेशाने कडक निर्बंध केले आहेत. कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होत असल्याने संभाव्य तिसर्या लाटेचा धोका लक्षात घेत आरोग्य खात्याकडून दोन डोस पूर्ण झालेल्यांना कोविशिल्ड बुस्टर डोस सुरू करण्यात आले आहेत. यासाठी खालापूर तालुक्यातील रसायनी पाताळगंगा हद्दीतील लोहोप प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविशिल्ड बुस्टर डोसचे उद्घाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा समन्वयक आरोग्यवर्धिंनी डॉ. सागर काटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. किरण पवार व प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.