स्वदेसमुळे खेकडी उत्पादनास चालना

कुडगावच्या मच्छिमाराचे उत्पन्न वाढले

| दिघी | प्रतिनिधी |

श्रीवर्धन तालुक्यात खेकडे उत्पादन करण्यासाठी चळवळ उभी राहत आहे. स्थानिक पातळीवर अनेक प्रकारच्या खेकडयांच्या जाती आढळून येतात. त्यामध्ये खिडपी चिंबोरी, पानकुर्ली, हिरवी कुर्ली, लालकुर्ली या प्रकारचे खेकडे असतात. कुडगावमध्ये अशाच एका मच्छिमाराने स्वदेस फाउंडेशनच्या मदतीने खेकडी जाळी प्रकल्प यशस्वी करून दाखवला आहे.

महाव्यवस्थापक प्रसाद पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, कुडगाव येथील दामू पाटील हे पूर्वी आजूबाजूच्या परिसरामध्ये मोलमजुरी करून उदरनिर्वाह करायचे. त्याची पत्नीही त्याच्यासोबत मजुरी करायची. उत्पन्नाचे साधन खूप मर्यादित होते. कुटुंबाचा पूर्ण खर्च मजुरीवर करावा लागत होता. दररोज मजुरी मिळत नसल्यामुळे दामूला तीन मुलांचे संगोपण आणि त्यांचे शिक्षण पूर्ण करणे या समस्या नेहमी भेडसावत होत्या. मात्र, दामू कानू पाटील यांनी 2020- 21 मध्ये स्वदेस फाऊंडेशनमार्फत खेकडा जाळी प्रकल्पाचा लाभ घेतला.

सुरुवातीला ते मजुरीसोबतच खेकड़ी ही पकडायचे. महिन्याला दहा ते पंधरा दिवस खेकड़ी पकडायचे व त्यातून दिवसाला साधारणपणे 3 ते 4 किलो खेकड़ी मिळतात. त्यातून त्याला प्रति दिवस पाचशे असे महिन्याला सहा ते सात हजात रुपये पर्यंतचे उत्पन्न मिळत असे. पण आता जाळी मिळाल्यापासून त्याच्या उत्पन्नात वाढ झाली आहे असे पाटील यांनी सांगितले. ज्यादिवशी मजुरी मिळत नाही त्यादिवशी तो खेकड़ी मधून उत्पन्न कमवतो. त्यातूनच एक नवीन उत्पन्नाचे पर्यायी साधन म्हणून सोबतच त्यांनी या वर्षी त्यांनी 163.5 फुट या मापाची पस्तीस हजारपर्यंत छोटी होड़ी बनवण्यासाठी ऑर्डर केली आहे. यामुळे पुढील महिन्यातून किमान दहा ते बारा हजार उत्पन्न नक्कीच मिळेल असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला.

मला तीन मुले आहेत आणि त्यांना उच्चशिक्षित करण्याचे माझं स्वप्न आहे. अशा परिस्थितीमध्ये आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी निश्‍चितच स्वदेस फाउंडेशन कडून मला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन व मदत झाली. स्वदेस फाउंडेशनचे खूप आभार.

दामू पाटील, मच्छीमार, कुडगाव

गावात असे खेकडी जाळी व पालन तसेच इतर व्यवसाय सुरू करायचा असेल तर स्वदेस च्या गाव विकास समितीकडे संपर्क करावे. इच्छूकांना आवश्यक ते सहकार्य मिळेल.

प्रसाद पाटील, महाव्यवस्थापक
Exit mobile version