बोपण्णाचे विक्रमी जेतेपद हुकले

| न्यूयॉर्क | वृत्तसंस्था |

भारताचा अनुभवी टेनिसपटू रोहन बोपण्णाचे विक्रमी विजेतेपद थोडक्यासाठी हुकले. रोहन बोपन्ना-मॅथ्यू एब्डेन (ऑस्ट्रेलिया) यांना अमेरिकन ओपन या प्रतिष्ठेच्या टेनिस ग्रँडस्लॅममधील पुरुष दुहेरीत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अमेरिकेचा राजीव राम आणि युनायटेड किंगडमचा ज्यो सॅलिसबरी या जोडीने रोहन-एब्डेन या जोडीवर तीन सेटमध्ये विजय मिळवत अजिंक्यपदावर मोहोर उमटवली.

वयाच्या 43व्या वर्षी ग्रँडस्लॅम विजेतेपद मिळवून पुरुष दुहेरीतील सर्वात वयस्कर ग्रँडस्लॅम जिंकणाऱ्या टेनिसपटूचा मान संपादन करण्याची रोहनकडे संधी होती. रोहन-एब्डेन या जोडीने पहिला सेट 6-2 असा जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर राजीव- सॅलिसबरी या जोडीने दुसऱ्या सेटमध्ये झोकात पुनरागमन केले. या जोडीने दुसऱ्या सेटमध्ये 6-3 अशी बाजी मारत बरोबरी साधली. राजीव- सॅलिसबरी या जोडीने तिसरा सेटही 6-4 असा खिशात टाकला आणि झळाळता करंडक पटकावला. रोहन-एब्डेन जोडीला दोन तास व एक मिनिटांत हार पत्करावी लागली. दरम्यान, जीन ज्युलियन रॉजर याने 40 वर्षे व नऊ महिन्यांचा असताना फ्रेंच ओपन स्पर्धा जिंकली होती.त्याने मार्सेलो अरीवोला याच्या साथीने पुरुष दुहेरीत ही किमया करून दाखवली होती. हा विक्रम मोडून नवा विक्रम नोंदविण्याची संधी रोहनकडे होती. पण त्याला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. भारताकडून सर्वात वयस्कर म्हणून पुरुष दुहेरीचे ग्रँडस्लॅम विजेतेपद पटकावण्याचा विक्रम लिएंडर पेस याच्या नावावर आहे. त्याने 40 वर्षे व दोन महिन्यांचा असताना 2013 मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धा जिंकली होती.

Exit mobile version