| पनवेल | प्रतिनिधी |
गेल्या काही महिन्यांपासून खारघर वसाहतीत पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र होत आहे. यावर मात करण्यासाठी अनेक गृहनिर्माण सोसायट्यांनी बोअरवेल जोडणीचा पर्याय स्वीकारला आहे. सिडकोकडून कमी दाबाने होणारा पाणीपुरवठा, तसेच पुढील काही दिवसांत उन्हाळा सुरू होणार आहे. उन्हाळ्यात सिडकोकडून रहिवाशांना पुरेसे पाणी मिळत नसल्याने सोसायट्यांवर स्वतःची पर्यायी व्यवस्था उभारण्याची वेळ आली आहे.
खारघर वसाहतीच्या लोकसंख्येत वाढ होत आहे. त्यात खारघर वसाहतीमधील पाणी अप्पर खारघर आणि तळोजा वसाहतीला उपलब्ध करून दिल्या जात असल्यामुळे रहिवाशांना पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे अनेक सेक्टरमध्ये रहिवासी सोसायट्यांमध्ये पिण्याच्या व घरगुती वापराच्या पाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर टँकरवर अवलंबून रहावे लागत होते. मात्र, टँकरचे वाढते दर आणि अनिश्चित वेळेमुळे रहिवाशांची गैरसोय होत असल्याने अनेक सोसायट्यांनी बोअरवेल खोदकाम करून त्याला पंप व पाण्याच्या टाक्यांशी जोडणी करण्यास सुरुवात केली आहे. परिणामी, बोअरवेल जोडण्यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढताना दिसत आहे.
रेनवॉटर हार्वेस्टिंगचा वापर
काही सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बोअरवेलमुळे सोसायटीमधील स्वच्छता, बागकाम, वाहन, तसेच कपडे धुणे आदी वापरासाठी लागणारे पाणी, तसेच टँकरवरील खर्चात काही प्रमाणात बचत होत असून, रहिवाशांवरील आर्थिक ताण कमी झाला आहे. काही सोसायट्यांनी पावसाळ्यात रेनवॉटर हार्वेस्टिंगची ही व्यवस्था केली असून, भूजल पातळी टिकवून ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
नियोजनाअभावी भविष्यात गंभीर संकट
बोअरवेल्समुळे तात्पुरता दिलासा मिळत असला तरी, योग्य नियोजनाशिवाय मोठ्या प्रमाणावर भूजल उपसा केल्यास भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. त्यामुळे बोअरवेल वापरासोबतच पाणी बचतला प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे मत पर्यावरण अभ्यासक व्यक्त करीत आहेत. तथापि भूजलाचा अतिवापर टाळण्याचा इशारा दिला आहे.
धोरण राबवण्याची गरज
नागरिकांकडून सिडकोकडे नियमित आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सोसायट्यांनी उचललेले बोअरवेलचे पाऊल हे तातडीचा उपाय ठरत असले, तरी दीर्घकालीन शाश्वत जलव्यवस्थापनासाठी सर्वसमावेशक धोरण राबविण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करीत आहेत.
