ब्लास्टिंगमुळे बोअरवेलचे पाणी बंद

वावर्ले ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण; प्रशासनाविरोधात आंदोलनाचा इशारा

| रसायनी | वार्ताहर |

पनवेल-कर्जत रेल्वे मार्गाचे काम चौक-वावर्ले गावाजवळ सुरु झाल्यापासून वावर्ले परिसरातील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. रेल्वेच्या या कामामुळे अवजड वाहतूक वाढल्याने मुख्य रस्त्याची चाळण झाली आहे. या रेल्वे रस्त्याचे काम सुरु असताना ब्लास्टिंग होत असल्याने वावर्ले आदिवासीवाडीतील बोअरवेलचे पाणी बंद झाल्याचा आरोप आदिवासी बांधवांकडून करण्यात आला असून, त्यांना पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली आहे. याबाबत बांधवांकडून संताप व्यक्त करण्यात येत असून, आंदोलन करण्याच्या पवित्र्यात आहेत.

दरम्यान, ब्लास्टिंगमुळे स्थानिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने स्थानिकांनी उद्धव ठाकरे शिवसेना विभागप्रमुख प्रफुल्ल विचारे यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे प्रशासन व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. यानंतर वावर्ले ग्रामस्थ व तहसीलदार यांच्यात बैठकही झाली; परंतु आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. यावेळी ग्रामस्थांचे नेतृत्व करणारे विभागप्रमुख प्रफुल्ल विचारे यांच्यावर गुन्हा दाखलही करण्यात आला आहे.

वावर्ले आदिवासीवाडीतील बोअरवेलचे पाणी गेल्याने आदिवासी महिलांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. यातच रेल्वे प्रशासन दादच देत नसल्याने सरपंच प्रिया विचारे, विभागप्रमुख प्रफुल्ल विचारे, शाखाप्रमुख विपुल पारठे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाला माजी खासदार राजू शेट्टी, कानसा वारणा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिपक पाटील यांनी जाहीर पाठिंबा दिला असून, या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगितले. वावर्ले ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांसह आसपासच्या परिसरातील गावे या आंदोलनात सक्रीय सहभागी होणार असल्याचे प्रफुल्ल विचारे यांनी सांगितले.

Exit mobile version