24 गावे-वाड्यांमध्ये होणार विंधनविहिरींची खोदाई

22 लाखांच्या निधीची तरतूद

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात दरवर्षी उद्भवणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन प्रशासनाकडून पाणीटंचाई कृती आराखडा तैनात करण्यात आला आहे. त्यात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विंधनविहिरी (बोअरवेल) खोदण्यात येणार आहेत. तालुक्यातील सहा गावे आणि 18 आदिवासी वाड्यांमध्ये या विंधनविहिरी खोदण्यात येणार आहेत. त्यासाठी पाणीटंचाई कृती समिती कडून 22.50 लाखांची तरतूद करण्यात आल्याची माहिती कर्जत पंचायत समितीचे प्रशासक चंद्रकांत साबळे यांनी दिली आहे.

कर्जत तालुक्यात यावर्षी पाणीटंचाई कृती आरखड्यात नवीन विंधन विहिरी खोदण्यावर भर देण्यात आला आहे. नवीन विंधन विहिरीमुळे त्या भागातील पाण्याची टंचाई कमी होण्यास मदत होईल. हे लक्षात घेऊन पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाणीटंचाई कृती आराखडा आ. महेंद्र थोरवे यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आला आहे. त्यासाठी समितीमध्ये तालुक्याचे तहसीलदार, रायगड जिल्हा परिषदेचे लघुपाटबंधारे विभाग उपअभियंता यांचा समावेश आहे. त्या समितीने तालुक्यातील सहा गावांमध्ये विंधन विहिरी खोदण्याचे काम मंजूर केले आहे. त्यासाठी 24 विहिरींची दुरुस्ती करण्यासाठी 22.50 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

तालुक्यातील कोळंबेपाडा-पोटल, बोंडेशेत-ओलमन, चेवणे-नांदगाव, खरवांडी- बीड, भालिवडी, चई प्राथमिक आरोग्य केंद्र-नांदगाव या सहा गावांमधील नवीन विहिरी खोदल्या जाणार आहेत. त्याचवेळी तालुक्यातील फोंडेवाडी, बेलदारवाडी कशेळे, कळंब बनाची वाडी, खरवाडी आदिवासी वाडी, भिवपुरी कातकरी वाडी, स्टेशन ठाकूरवाडी, लाखाची वाडी, ताडवाडी, मोरेवाडी, ऐनाचीवाडी, इंजीवली देशमुख वरई, भोंबलवाडी, धाकटे वेनगाव, पाचखडकवाडी, कडाव तळ्याची वाडी, कडाव आंब्याची वाडी, माणगाव ठाकूरवाडी, किकवी बिरवाडी येथे नवीन विंधन विहिरी खोदल्या जाणार आहेत. दरम्यान, प्रत्येक विंधन विहिरीसाठी 90 हजारप्रमाणे 22.50 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी माहिती पाणीटंचाई कृती आरखडा समितीचे सचिव कर्जत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रकांत साबळे यांनी दिली.

Exit mobile version