बांधकाम विभागाच्या नियोजनशून्य कारभाराचा फटका
संबंधित अधिकारी, ठेकेदारावर कारवाईची मागणी
| कोर्लई | वार्ताहर |
शासनाच्या बांधकाम विभागातर्फे साळाव-मुरुड रस्त्यावरील बोर्ली-नाका रस्त्यावरील काँक्रिटिकरण कामाची मे 2023 च्या पहिल्या आठवड्यातील वर्क ऑर्डर असताना ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर कामाला सुरुवात करण्यात आल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यामुळे गणेशभक्तांसह बाप्पालाही अखेर ठेकेदाराच्या तसेच बांधकाम खात्याच्या नियोजनशून्य कारभाराचा मनस्ताप सहन करावा लागला. दरम्यान, बांधकाम विभागाचे अधिकारी व संबंधित ठेकेदार यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी बोर्ली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच चेतन जावसेन यांनी केली आहे.
मुरुड तालुक्यातील बोर्ली नाका ही मुख्य बाजारपेठ आहे. या बाजारपेठेत गणेशोत्सवात लाखोंची उलाढाल होत असते. मागील दोन वर्षापूर्वी आलेल्या पुरामुळे येथील व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. त्यातून सावरत असताना यावर्षी ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरच बोर्ली नाका रस्ता काँक्रिटकरणाचे काम सुरु करण्यात आले. सदर कामाची मागणी ही माझ्या सरपंचपदाच्या कालावधीत जेव्हा बोर्ली नाका येथे पूर आला असता माजी आमदार पंडित पाटील यांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे करण्यात आली होती. त्यानंतर मागणीचा सातत्याने पाठपुरावा करून बोर्ली नाका येथे रस्ता कॉक्रिटिकरणासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला.
या कामासाठी तत्कालीन सहाय्यक अभियंता महेश नंदेश्वर यांचेदेखील सहकार्य लाभले होते. सत्ताधारी पक्षाला याची कुणकुण लागल्यावर यात अपरिपक्व राजकारणाला पेव फुटले. रस्त्यासाठी आंदोलनाचा फार्स झाला तर खड्डेमय, खराब रस्त्याचे खापर सुप्रभात कन्स्ट्रक्शन कंपनीवर फोडण्यात आले अन् आंदोलनानंतर दोन दिवसांत सत्ताधारी पक्षाचे पदाधिकारी या रस्त्याच्या काँक्रिटिकरण कामाचा नारळ फोडतात.हे पाहता, हा सर्व खटाटोप केवळ फक्त आणि फक्त श्रेय लाटण्यासाठी तर नाही ना? याची चर्चा मुरब्बी राजकारणी करीत असल्याचे चेतन जावसेन यांनी सांगितले.