मुंबईतील दोन्ही विमानतळे मेट्रोने जोडणार

‌’गोल्डन लाईन’ प्रकल्पाला वेग

| पनवेल | ग्रामीण प्रतिनिधी |

महाराष्ट्र सरकारने जानेवारी महिन्यात छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ यांना मेट्रोने जोडण्यास मंजुरी दिल्यानंतर आता या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला गती मिळू लागली आहे. सिडको ने प्रस्तावित मेट्रो मार्गासाठी कन्सल्टन्सी नियुक्तीच्या बोली प्रक्रिया सुरू केल्याने काम लवकरच प्रत्यक्षात सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

‌‘मेट्रो-8′ किंवा ‌‘गोल्डन लाईन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मार्गामुळे मुंबईतील दोन्ही आंतरराष्ट्रीय विमानतळ थेट मेट्रोद्वारे जोडले जाणार आहेत. या प्रकल्पासाठी केंद्र व राज्य सरकार प्रत्येकी 20 टक्के निधी उभारतील, तर उर्वरित 60 टक्के निधी पीपीपी (पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर उभारला जाणार आहे. दिल्ली नंतर देशातील दुसरे सर्वात मोठे मेट्रो नेटवर्क मुंबईत आहे. एप्रिल 2026 पर्यंत सुमारे 100 किमी मार्गावर मेट्रो सेवा सुरू आहे. ब्लू, यलो, रेड आणि ॲक्वा या प्रमुख लाईन्स कार्यरत असून, मेट्रो लाईन 9 आणि 2-बीचा काही भागही सुरू झाला आहे. दररोज सकाळी 5:30 ते रात्री 11:30 या वेळेत मेट्रो सेवा सुरू असते आणि प्रवाशांमध्ये ती लोकप्रिय ठरत आहे.

‌‘मेट्रो-8' प्रकल्पाचे वैशिष्ट्य
प्रस्तावित मेट्रो-8 मार्ग सुमारे 34 किलोमीटर लांबीचा असून त्यात एकूण 20 स्थानके असतील. त्यामध्ये 14 एलिव्हेटेड आणि 6 भूमिगत स्थानकांचा समावेश आहे. एकूण 9.25 किमी मार्ग भूमिगत तर 24.636 किमी मार्ग उंच पुलावरून जाणार आहे. या प्रकल्पासाठी सुमारे 22,862 कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी ही माहिती दिली होती. प्रकल्प साधारणतः 5 वर्षांत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट असले तरी, तो 3 वर्षांत पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या मेट्रो मार्गामुळे मुंबईतील हवाई वाहतुकीला मोठा दिलासा मिळणार असून, प्रवाशांचा प्रवास अधिक जलद, सोयीस्कर आणि किफायतशीर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Exit mobile version