राडाप्रकरणावर आ. भास्कर जाधवांची प्रतिक्रिया
। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
भाजप नेते नीलेश राणे आणि उद्धव ठाकरे गटातील भास्कर जाधव या दोघांमध्ये शुक्रवारी (दि.16) गुहागरमध्ये जोरदार राडा झाला. यावेळी दगडफेकदेखील झाली. दगडफेकीत नीलेश राणे यांच्या ताफ्यातील गाड्यांच्या काचा फुटल्याची माहिती मिळाली आहे. तसेच, राड्याप्रकरणी पोलिसांनी ४०० जणांवर गुन्हे दाखल केले असून या प्रकरणावर उद्धव ठाकरे गटाचे आ. भास्कर जाधव यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
भास्कर जाधव म्हणाले, पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यापूर्वी सगळा घटनाक्रम बघावा. असे काहीतरी घडू शकते याची आम्ही पोलिसांना आधीच कल्पना दिली होती. मात्र, नीलेश राणे यांची सभा गुहागरला असताना त्यांनी माझ्या कार्यालयासमोर वाट्टेल ते पोस्टर लावले. सभेसाठी गुहागरला जाण्यासाठी नीलेश राणेंना दोन रस्ते असताना ते मुद्दाम चिपळूनमध्ये आले. तसेच, वेगवेगळे टीजर प्रसारित करत दंगल घडविण्याची वातावरण निर्मिती केली होती.
पुढे ते म्हणाले, पोलीस रस्त्यावर असतानादेखील निलेश राणे यांनी माझ्या कार्यालयासमोर सत्कार घ्यायचा आणि धिंगाणा करायचा अशी भूमिका घेतली. त्यामुळे पोलिसांनी त्यांना रोखून धरलं. यानंतर त्यांनी पायी चालत मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला. मात्र, पोलिसांनी त्यांचे सत्कार, स्वागत कार्यक्रम करुन त्यांना गाडीत कोंबून गुहागरला रवाना करायला पाहिजे होते. पोलिसांनी आपले कर्तव्य केले असते तर निश्चितपणे हा प्रकार टाळू शकले असते.