मोरा जेटीचा खर्च 75 कोटींवर; रेवस जेटीसाठी 30 कोटींचा खर्च
। उरण । वार्ताहर ।
उरणला जलमार्गाने जोडणार्या मोरा ते मुंबईतील भाऊचा धक्का आणि करंजा ते रेवस या दोन्ही रो-रो सेवांचे काम रखडले आहे.
रो-रो सेवांसाठी जवळपास 105 कोटी रुपये राज्य सरकार खर्च करणार आहे. सुरुवातीला मोरा जेट्टीसाठी 50 कोटी; तर करंजा-रेवससाठी 25 कोटी मंजूर झाले होते; मात्र कामाच्या दिरंगाईमुळे खर्चात वाढ होऊन मोरा जेट्टीचा खर्च 75 कोटींवर गेला आहे; तर रेवस जेट्टीसाठी 30 कोटींचा खर्च झाला आहे. गेल्या वर्षी सुरू झालेल्या मोरा-भाऊचा धक्का या रो-रो सेवेचे कामदेखील याच धर्तीवर आहे. मागील सहा महिन्यांपासून हे काम बंद आहे.2018ला मंजूर झालेल्या मोरा ते भाऊचा धक्का या रो-रो सेवेच्या कामासाठी वर्षभरापासून एकही दगड रचलेला नाही. सागरमाला योजनेतून हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यातील करंजा बंदरावरील जेट्टीचे काम पूर्ण होऊन पाच वर्षे झाली आहेत. यातील जेट्टीची दुरवस्था होऊ लागली आहे, मात्र या जलमार्गावरील रेवस जेट्टीचे काम अनेक कारणांनी रखडले आहे. हे काम पूर्ण करण्यासाठी नव्याने निविदा मागवण्यात आल्या आहेत, तसेच मोरा ते मुंबईतील भाऊचा धक्का या रो-रो मार्गावरील भाऊचा धक्का ही जेटी कार्यान्वित झाली आहे, मात्र मोरा जेट्टीचे काम चार वर्षांपासून रखडले आहे. हे काम रखडल्याने 50 कोटींच्या कामाची रक्कम 75 कोटींवर पोहोचली आहे.
कुचकामी ठरण्याची शक्यता
दोन्ही रो-रो सेवांच्या उपयुक्ततेविषयी नागरिकांच्या मनात शंका आहेत. रेवस-करंजा हा पूल झाल्यानंतर थेट पुलावरून आपली वाहने नेता येणार आहेत. त्यामुळे या रो-रोचा वापर नागरिक करतील का? तसेच, करंजा रो-रो जेट्टीपर्यंत जाण्यासाठी सुसज्ज रस्ता नसल्यामुळे ही रो-रो सेवा कुचकामी ठरण्याची शक्यता आहे, तर मोरा ते भाऊचा धक्का या जलमार्गावर असणारी लॉन्च सेवा ही उरण लोकल आणि अटल सेतूमुळे बंद पडायला आली आहे. त्यामुळे जलमार्गाचा वापर कमी झाला आहे. त्यामुळे ही रो-रो सेवा किती उपयुक्त ठरेल, अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.
केंद्र सरकारच्या सागरमाला योजनेतून रस्त्यावरील वाहनांचा भार कमी करण्यासाठी जलवाहतुकीला प्रोत्साहन दिले जात आहे. करंजा ते रेवस रो-रो सेवेची नव्याने निविदा काढण्यात आली आहे. मोरा जेट्टीचे काम लवकरच सुरू करण्यात येऊन मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येईल.
– सुधीर देवरे, कार्यकारी अभियंता,
महाराष्ट्र मेरिटाइम मंडळ