कर्जतमध्ये ड्रोनद्वारे सीमानिश्‍चिती

336 गावांतील गावठाण जमिनीची होणार मोजणी
| कर्जत | वार्ताहर |
कर्जत तालुक्यातील सर्व गावांतील गावठाण क्षेत्रातील घरे, रस्ते व नाले यांच्या सीमा निश्‍चित करण्यासाठी सर्व्हे ऑफ इंडिया, भूमीअभिलेख कर्जत, महसूल व वन विभाग कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील 336 गावांतील गावठाण जमिनींच्या ड्रोन सर्व्हेक्षणाची सुरुवात शिरसे ग्रामपंचायत हद्दीतील तमनाथ येथून आ. महेंद्र थोरवे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आली.
या महत्त्वपूर्ण ड्रोन सर्व्हेक्षणानंतर ग्रामीण भागातील घरमालकांना आपल्या मिळकतीचे प्रॉपर्टी कार्ड मिळणार असून, असल्याने अनेक प्रकारचा शासकीय लाभ भविष्यात स्थानिक व ग्रामीण भागातील नागरीकांना मिळणार असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. राज्य सरकारकडून ग्रामीण भागातील प्रत्येक गावातील गावठाण क्षेत्रात असलेल्या मिळकतींचे संरक्षण करण्यासाठी सर्वे ऑफ इंडियाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले असून, स्थानिक पातळीवर भूमीअभिलेख, महसूल व वन विभाग संयुक्तपणे ही जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडत आहे. नुकताच तमनाथ येथे आ. महेंद्र थोरवे यांच्या हस्ते उद्घाटन करुन या नाविन्यपूर्ण अभियानाची सुरुवात शासकीय पातळीवरुन करण्यात आली आहे. त्याप्रसंगी कर्जत तहसीलचे तहसीलदार विक्रम देशमुख, भूमीअभिलेख उपअधीक्षक इंद्रसेन लांडे, विधानसभा संघटक संतोष भोईर, सरपंच आरती संदीप भोईर, उपसरपंच रवींद्र भोईर, तालुकाप्रमुख उत्तम कोळंबे, नगरसेवक संकेत भासे, उद्योजक संदीप भोईर, रमेश कदम, नारायण पायगुडे, रमेश लोभी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

वेळ आणि मनुष्यबळाची बचत
यामधून गावठाण क्षेत्र निश्‍चित करण्यासाठी संपूर्ण राज्यात हे नाविन्यपूर्ण अभिमान सुरु आहे. त्यामाध्यमातून कर्जत तालुक्यातील 336 गावांतील गावठाण जमिनींची मोजणी केली जाणार आहे. हे ड्रोन सर्व्हेक्षण करताना एकदा ड्रोनने आकाशात झेप घेतली की एकाच वेळी पाच गावांचे सर्वेक्षण करण्याची किमया अवघ्या काही मिनिटात या ड्रोनच्या माध्यमातून सफल होत असल्याने वेळेची व मनुष्यबळाची मोठी बचत होत आहे.

Exit mobile version