‘एसआरटी’ तंत्रामुळे भरघोस पीक

चौलमळा येथील रवींद्र पाटील यांची यशोगाथा

| चौल | प्रतिनिधी |

अलिबाग तालुक्यातील चौलमळा येथील रहिवासी रवींद्र गजानन पाटील यांनी यंदा एक एकरात ‘एसआरटी’ तंत्राचा वापर करून भाताचे उत्पादन घेतल्याने उत्पादनात वाढ झाली आहे. तसेच चिखळणी, मळणी, रोवणी, तसेच मजुरी आदी खर्चात मोठी बचत केली.

रवींद्र पाटील यांची सुमारे पाच-सहा एकर शेती आहे. विज्ञान या शाखेतील पदव्युत्तर पदवी त्यांनी घेतली आहे. आरसीएफ थळ येथील आरसीएफ कंपनीतून याच वर्षी ते सेवानिवृत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांनी शेतीच करणे पसंत केले आहे. आता ते पूर्णवेळ शेतकरी झाले आहेत. अन्य शेतकर्‍यांनीसुद्धा या पद्धतीचा अवलंब करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

पाटील यांना शेतीची आवड होतीच. मात्र, पूर्वी नोकरीमुळे त्यात वेगवेगळे प्रयोग करून पाहणे शक्य होत नव्हते. मात्र, प्रयोगशीलतेची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. अशातच त्यांना कर्जत तेथे एसआरटी (सगुणा राईस टेक्निक) पद्धतीने भात लागवडीचे पाहण्यास मिळाली. प्रयोगशील व प्रगतिशील शेतकरी चंद्रशेखर भडसावळे यांनी ही पद्धत विकसित केल्याचे त्यांना सांगण्यात आले. या पद्धतीचे फायदे लक्षात आल्यानंतर आपणही त्याचा प्रयोग करून पाहावा, असे पाटील यांनी ठरवले.

खर्च, वेळ, श्रम वाचले
पारंपरिक भातशेतीत रोपे तयार करण्यासाठी चिखलणी करावी लागते. सुमारे 21 दिवसांनंतर रोपवाटिकेतील रोपांची पुनलागवड करताना पुन्हा चिखलणीचे काम करावे लागते. एसआरटी पद्धतीत थेट रोवणी केल्याने चिखलणी, मळणी व पुनर्लागवड अशी तीनही कामे वाचली. त्यातील खर्चातही बचत झाली. एसआरटी पद्धतीत साडेचार फूटी बेड ठेवला. याच बेडवर रोवणी केली जाते. पंचवीस बाय 25 सेंटीमीटर असे अंतर दोन रोपांत ठेवले.

मजूरबळात बचत
पारंपरिक शेतीत एकरी 10 याप्रमाणे तीन एकरांत 60 जणांचे मजूरबळ व तेवढे पैसे लागले असते. हा खर्च एकरी 3000 ते 5000 रुपयांपर्यंत पोहोचला असता. त्या तुलनेत एसआरटी तंत्राद्वारे बियाणे रोवणीसाठी चार मजुरांचीच गरज भासली. रोवणीसाठी एसआरटी साचा (लोखंडी) हाताळणीचे काम त्यांच्याव्दारे होते. त्यात दोन मजूर साचा उचलण्यासाठी, तर दोन मजूर बियाणे विशिष्ट जागेत लावण्यासाठी असतात. साच्यामुळे एकसंघ रोवणीचा उद्देश साधता येतो.

पिकाला होतो फायदा
दोन बेडसमध्ये पुरेसे अंतर ठेवल्याने हवा खेळती राहते. त्याचा पुढे उत्पादनावर परिणाम होतो, असे पाटील यांनी सांगितले. या पद्धतीत युरिया डीएपी ब्रिकेटचा वापर शक्य होतो. जिथे पारंपरिक पद्धतीत रासायनिक खतांचे तीन डोसेस द्यवे लागतात, तिथे या पद्धतीत एक डोस व त्यावरील खर्च वाचल्याचे ते म्हणाले. खत वाहून जाण्याचा धोका राहात नाही. थेट मुळांना खत मिळत असल्याने उत्पादनात वाढ झाल्याचे पाटील म्हणाले.

फुटवे अधिक
पारंपरिक लागवड पद्धतीत रोपाला 15 ते 20 फुटवे येतात. एसआरटी पद्धतीत 30 हून अधिक फुटवे येतात. पारंपरिक पद्धतीत पुनर्लागवड करताना रोपे एक ठिकाणावरून दुसरीकडे लावताना मुळांना इजा होण्याचा धोका असतो. एसआरटी पद्धतीत मात्र थेट बियाणे लावले जात असल्याने असा धोका संभवत नाही. पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत साधारणतः आठ दिवस आधीच पीक कापणीस येते.

पारंपरिक पद्धत – एकरी 12 क्विंटल
एसआरटी पद्धतीत – 15 क्विंटल.

Exit mobile version