गोलंदाजाचा पोरगा अमेरिकेसाठी धावला

। पॅरिस । वृत्तसंस्था ।

अमेरिकेने 40 सुवर्ण, 44 रौप्य व 42 कांस्य अशा एकूण 126 पदकांसह अव्वल स्थान पटकावले. यामध्ये सर्वाधिक पदके ही मैदानी स्पर्धेत अमेरिकेने जिंकली आहेत. अ‍ॅथलेटिक्समध्ये अमेरिकेने 14 सुवर्ण, 11 रौप्य व 9 कांस्य अशी एकूण 34 पदकं जिंकली, त्यापाठोपाठ जलतरणात 28 पदकं अमेरिकेच्या नावावर आहेत. मैदानी स्पर्धेतील 14 सुवर्णपदकांमध्ये क्रिकेटपटूच्या लेकाच्या दोन पदकांचा समावेश आहे.

अमेरिकन धावपटू रे बेंजामिन याने 400 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले. 27 वर्षीय बेंजामिन याने गतविजेता व विश्‍वविक्रमी कार्स्टेन वॉर्होल्म याला पराभूत केले. त्याने 46.46 सेकंदात ही शर्यत पूर्ण करून कारकीर्दितील त्याचे पहिले सुवर्णपदक जिंकले. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने 46.17 सेकंदात अंतर पार करून रौप्यपदक जिंकले होते आणि तो 400 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीतील जगातील दुसरा वेगवान धावपटू आहे. याशिवाय त्याने पॅरिसमध्ये 4 बाय 400 मीटर रिले शर्यतीतही सुवर्णपदक जिंकले.

न्यू यॉर्कमध्ये जन्म झालेल्या बेंजामिनने पहिली शर्यत ही अँटीग्वा व बार्बुडा येथील राष्ट्रीय स्पर्धेत खेळली, कारण त्याचे वडील हे कॅरेबियनवासी होते. 2013 मध्ये जागतिक युवा अजिंक्यद आणि 2015 मध्ये जागतिक रिले स्पपर्धेत अँटिग्वाचे प्रतिनिधित्व त्याने केले होते. पण, त्याला अमेरिकेकडून खेळायचे होते आणि 2018 मध्ये त्याला ही संधी मिळाली.

बेंजामिन अन् क्रिकेट कनेक्शन
बेंजामिन हा वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटूट विन्स्टन बेंजामिन यांचा मुलगा आहे. त्यांनी वेस्ट इंडिजकडून 21 कसोटी व 85 एकदिवसीय सामने खेळले असून 100 हून अधिक बळी घेतले आहेत. 1987 व 1992 च्या विश्‍वचषक स्पर्धेतील संघाचे ते सदस्य होते. रे यानेही वडिलांसारखा जलदगती गोलंदाज होण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच्यातील कौशल्य पाहून प्रशिक्षकांनी त्याला धावपटू होण्याचा सल्ला दिला.
Exit mobile version