| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
भारताच्या एका स्टार महिला बॉक्सरला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. या बॉक्सरने आशियाई स्पर्धेमध्ये पदक पटकावलं होतं. त्याचबरोबर पॅरिस ऑलिम्पिक कोटा देखील मिळवला होता. मात्र डोपिंगमध्ये सापडण्याच्या टांगत्या तलवारीमुळे पदक आणि कोटा दोन्ही हातातून जाण्याची चिन्हे दिसत आहेत. दरम्यान, सध्यातरी या बॉक्सरचे नाव समोर आलेले नाही. मात्र हे नाव लवलिना बोर्गोहेन किंवा निखत झरीनचं देखील असू शकतं. आशियाई स्पर्धेमध्ये भारताच्या चार महिला बॉक्सरनी पदके जिंकली होती. भारतीय बॉक्सर डोपिंगच्या जाळ्यात नक्कीच अडकली आहे. आशियाई स्पर्धे पूर्वीच्या काळात ही बॉक्सर कुठं होती याचाबाबतची माहिती देण्यात ती अपयशी ठरली आहे. जर डोपिंगमध्ये ती दोषी आढळली तर तिच्यावर जास्तीजास्त दोन वर्षाची बंदी येऊ शकते. ही बंदी एका वर्षापर्यंत कमी होऊ शकते.
याचबरोबर तिची या प्रकरणात किती चूक आहे हे पाहिले जाईल. यामुळे आशियाई स्पर्धे मधील पदक आणि पॅरिस ऑलिम्पिक कोटा देखील गमवू शकते. आयटीएने ऑलिम्पिक काऊन्सील ऑफ एशियाला हांगझू मधील एशियन गेम्सदरम्यान अँटी डोपिंग प्रोग्राममध्ये मदत करण्यासाठी सांगण्यात आले होते. बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाला या प्रकरणात आपल्या बाजूने निकाल लागेल अशी आशा आहे. ‘नोटिसमध्ये आशियाई स्पर्धेपूर्वीचा उल्लेख आहे. फेडरेशनला याबाबत आशियाई स्पर्धे नंतर माहिती मिळाली. त्या काळात ही बॉक्सर मानसिकदृष्ट्या खचलेली होती. तिच्या कुटुंबातील व्यक्तीला एक गंभीर आजार झाल्याचे समजले होते. ‘बॉक्सिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या कायदेशीर बाबी पाहणाऱ्या संघाला याबाबत सुचना दिली आहे. ते या प्रकरणात लक्ष घालत आहेत. जर आम्ही कारण स्पष्ट करू शकलो तर पदक काढून घेणे किंवा ऑलिम्पिक कोटा गमावणे असा कोणताही प्रकार होण्याची शक्यता नाही.’