संगणकी कामकाजावर बहिष्कार

। सिंधुदुर्ग । वृत्तसंस्था ।
महसूल विभागातील संगणकीकरण कामकाजासंदर्भात ई-महाभूमी प्रकल्पाचे राज्य समन्वयक रामदास जगताप यांनी केलेली असंविधानिक भाषा व चुकीच्या कार्यपद्धती विरोधात रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्हा तलाठी संघाच्या कणकवली शाखेच्या वतीने महाभूमी प्रकल्पाच्या संगणकी या कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला आहे.
या निषेध आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर कणकवलीतील तलाठी व मंडळाधिकारी यांनी नियोजित आंदोलनानुसार आपल्याकडील डीएससी (टोकन) तहसीलदार आर. जे. पवार यांच्याकडे जमा केले आहेत. यामुळे तलाठी मंडळ अधिकारी स्तरावरील जवळपास या अनुषंगानेच चालणारे सर्व कामकाज ठप्प झाले आहे.
ई-महाभूमी प्रकल्पाचे कामकाज करत असताना संगणकीकरणामध्ये असलेल्या अनेक त्रुटी दूर करण्याची मागणी करण्यात आली होती. तलाठी, मंडळ अधिकारी यांनी दिवस-रात्र मेहनत घेत सातबारा संगणकीकरण, ई-पीक पाहणी किंवा अन्य कामे मार्गी लावली. मात्र त्या येणार्‍या अडचणी दूर न करतात तलाठी, मंडळ अधिकारी यांच्यावर अनेक निर्णय लादून त्रास देण्याचा प्रकार सुरू असल्याचाही आरोप करण्यात आला. या सार्‍या प्रकारामुळे जनतेच्या रोषाला तलाठी, मंडळ अधिकारी यांना सामोरे जावे लागत आहे. तरी यासंदर्भात शासनस्तरावरून निर्णय घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

Exit mobile version