तलाठी, सर्कलचे कामांवर बहिष्कार

ऑनलाईन काम बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद; शासकीय कामांवर परिणाम

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

ऑनलाईन कामांसाठी असलेली उपकरणे जीर्ण झाली आहेत. त्या ऐवजी नवीन लॅपटॉप, प्रिंटर कम स्कॅनर देण्याची मागणी अनेक वेळा शासनाकडे करण्यात आली आहे. मात्र, शासनाकडून त्याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या जिल्ह्यातील तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) व मंडळ अधिकारी यांनी एकत्र येऊन सोमवारी (दि.15) ऑनलाईन कामांवर बहिष्कार टाकला. जिल्हाधिकारी कार्यालयासह उपविभागीय अधिकारी कार्यालय व तहसील कार्यालयासमोर निर्देशने करून जीर्ण उपकरणे (डिजीटल सिग्नेचर सर्टिफिकेट मशीन) तहसीलदारांकडे जमा करण्यात आली. या ऑनलाईन काम बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. त्याचा मोठा परिणाम शासकीय कामांवर झाला.

सातबारा फेरफार नोंदणी, पीक पाहणी आदी कामे गतीमान व्हावीत, यासाठी शासनाने ऑनलाईन सेवेवर भर दिला आहे. पंचनामा प्रणालीसह ई हक्क, सातबारा वाटप आदी कामे कार्यक्षमतेने प्रदान करण्यासाटी संगणकीकृत साधन सामुग्री तलाठी तथा ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांना देण्यात आली. 2016पासून ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. लॅपटॉप व प्रिंटर ही 2016 ते 2019 दरम्यान उपलब्ध करण्यात आली आहेत. त्यामुळे ही सामुग्री कालबाह्य झाली आहेत. सातबारा व आठ अ व फेरफार यांच्या नक्कल वितरणाची ठरवून दिलेली फी ग्राम महसूल अधिकारी दर महिन्याला शासन जमा करीत आहेत.

आयटी उपकरणांचे आयुष्यमान पाच वर्षे इतके असल्याचे शासन निर्णयानुसार निश्चित करण्यात आले आहे. परंतु, या उपकरणांचा कालावधीत अधिक झाला आहे. ही उपकरणे कालबाह्य व नादूरुस्त व निकृष्ट अवस्थेत आहेत. या उपकरणांची कार्य गती फारच कमी आहे. पंचनामा प्रणालीसह ई हक्क सारख्या सुधारीत प्रणालींवर कामे करणे अशक्य होत नाही. त्यामुळे ऑनलाईन सेवा वेळेत देताना अडचणी निर्माण होत आहेत. प्रचंड कामकाजाच्या ताणामुळे कर्मचारी वर्गात मानसिक तणाव व असंतोष निर्माण होत आहे. त्याचा आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे नवीन उपकरणे देण्यात यावी अशी मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. शासन निर्णय असूनही उपकरणे खरेदी प्रक्रिया रखडल्याचे चित्र आहे. शासनाच्या धोरणाचे यातून उल्लंघन होत असल्याचा आरोप तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या वतीने संपूर्ण राज्या ऑनलाईन कामकाज पुर्णतः बंद करण्याची भुमिका घेतली आहे. त्याची कार्यवाही सोमवार (दि. 15) पासून सूरू केली आहे. रायगड जिल्ह्यातील तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला आहे. जिल्ह्यातील सहाशेहून अधिक तलाठी व मंडळ अधिकारी यांनी ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकत नवीन उपकरणे देण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी जिल्ह्यातील तहसीलदार यांना डीजीटल सिग्नेचर सर्टीफिकेट मशीन देण्यात आली.

ऑनलाईन कामांवर परिणाम
रायगड जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकला. हे काम बंद ठेवण्यात आले आहे. त्यामुळे ई पिक पाहणी, ई हक्क ई पंचनामाा, फेरफार, सातबारा आदी ऑनलाईन कामांवर त्याचा परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे. या आंदोलनामुळे सर्वसामान्यांची ऑनलाईन कामे ठप्प झाली आहेत.
मागण्यांवर दृष्टीक्षेप
शासन निर्णयानुसार नवीन लॅपटॉप व प्रिंटरची जीईएम पोर्टलद्वारे खरेदी प्रक्रीया तात्काळ सुरू करून सर्व ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांना तातडीने उपलब्ध करून द्यावे. कालबाह्य उपकरणांच्या विल्हेवाट प्रक्रीया त्वरित पूर्ण करण्यात यावी. खरेदी प्रक्रीयेतील अनावश्यक विलांबाबाबत विभागीय स्तरावर जबाबदारी निश्चित करण्यात यावी.

नवीन लॅपटॉप व स्कॅनर प्रिंटर मिळावेत अशी शासन स्तरावर बऱ्याच दिवसापासूनची मागणी आहे. परंतु शासन याला गांभीर्याने घेत नसल्याने सोमवारपासून महाराष्ट्र राज्य तलाठी संघाच्या वतीने राज्यातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांनी ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकत डिएससी मशीन जमा केली. जिल्ह्यात आंदोलनाला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे.

-संजय शिंगे
रायगड जिल्हा तलाठी संघ

Exit mobile version