….तर ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार

चिरनेर ग्रामस्थांचा एकमुखी निर्धार; ग्रामसभेत निवडणूक न लढविण्याचा ठराव


| चिरनेर | वार्ताहर |

दरवर्षी चिरनेर गावात निर्माण होणारी पूरपरिस्थिती तसेच भोम ते चिरनेर अक्कादेवी युद्धभूमीकडे जाणारा नादुरुस्त रस्ता, त्याचबरोबर गावातील नागरिकांना भेडसावणाऱ्या इतर महत्त्वाच्या समस्या जोपर्यंत शासन मार्गी लावत नाही, तोपर्यंत जरी चिरनेर ग्रामपंचायतची निवडणूक जाहीर झाली, तरीसुद्धा ही निवडणूक न लढविण्याचा पवित्रा गुरुवारी 14 सप्टेंबर रोजी पार पडलेल्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी घेतला.

सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाटील यांनी हा मुद्दा ग्रामसभेत उपस्थित केला होता. ग्रामसभेला उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्यांच्या या मुद्द्याला पाठिंबा दर्शविला. दरम्यान, याबाबतचा तसा ठरावही लिहून घेण्यात आला आहे. त्याचबरोबर 25 सप्टेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या चिरनेर जंगल सत्याग्रहाचा स्मृतिदिन अभिवादन सोहळा हा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला आहे. यावेळी विविध विषयांनी ही ग्रामसभा गाजली. चिरनेर या ऐतिहासिक गावातील नादुरुस्त रस्ते, दरवर्षी निर्माण होणारी पूरपरिस्थिती आणि इतर काही येथील ग्रामस्थांना भेडसावणाऱ्या समस्या गावात आहेत. या सर्व समस्यांचा येथील ग्रामस्थांना वारंवार सामना करावा लागत आहे. यात नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. आणि नागरिकांना याचा त्रासही सहन करावा लागत आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी या गंभीर समस्या मार्गी लागाव्यात, यासाठी हा पवित्रा घेतला आहे.

या ग्रामसभेला प्रशासक श्री. मिंडे, ग्रामविकास अधिकारी महेश पवार, पोलीस पाटील संजय पाटील, चिरनेर गाव तंटामुक्तीचे अध्यक्ष अलंकार परदेशी, शेकापचे सुरेश पाटील, सामाजिक कार्यकर्ते सचिन घबाडी, जयेश खारपाटील, समाधान म्हात्रे, समीर डुंगीकर तसेच अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Exit mobile version