37 लाखांहून अधिकचा दंड वसूल
| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबईतील पामबीच मार्ग, सायन-पनवेल मार्ग, ठाणे-बेलापूर या महामार्गावरील अतिवेगाने धावणार्या वाहनांवर नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाने कारवाईचा बडगा उचलला आहे. त्यानुसार गेल्या दीड वर्षात स्पीड गनच्या माध्यमातून जवळपास 11 हजार 237 वाहनांवर कारवाई केली असून, 37 लाखांहून अधिकचा दंड वसूल केला आहे.
नवी मुंबई शहरात वाहन अपघातांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या अपघातांसाठी अतिवेगाने धावणार्या वाहनांवरील ताबा सुटून झालेल्या अपघातांच्या घटना अधिक आहेत. नवी मुंबई शहरातील पामबीच मार्गावर हे प्रमाण सर्वाधिक आहे. त्यामुळे या मार्गावर नित्याने अपघात होत असल्यामुळे वाहनचालकांच्या अतिवेगाला नियंत्रणात आणण्यासाठी आरटीओ स्पीड गनच्या माध्यमातून नजर ठेवत आहे. याच अंतर्गत नोव्हेंबर 2021 पासून आतापर्यंत 11 हजार 237 वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे; तर वेगमर्यादेचे उल्लंघन करणार्या अशा वाहनांकडून नवी मुंबई उपप्रादेशिक परिवहन विभागाने वर्षभरात 37 लाख 47 हजार 300 रुपयांचा दंडदेखील वसूल केला आहे.
वाशी पुलावर विशेष पथक तैनात
मुंबई आणि नवी मुंबई या दोन महत्त्वाच्या शहरांना जोडणार्या सायन-पनवेल महामार्ग हा अत्यंत वर्दळीचा महामार्ग आहे. या महामार्गावरील वाशी टोलनाका, तसेच खाडीवरील पूल अपघात प्रवण क्षेत्र म्हणून घोषित आहे. या मार्गावरील वाढते अपघात, त्याचप्रमाणे वाहतूक कोंडीच्या समस्येवर पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली होती. त्यानुसार अतिवेगाने वाहन चालवणार्या 145 जणांवर कारवाई केली आहे. तसेच वाशी पुलावर अपघात टाळण्यासाठी टोईंग वाहनासह गस्तीपथक तैनात करण्यात आले आहे.