झाडांवर लटकलेल्या फांद्या छाटल्या

| पाली /बेणसे | वार्ताहर |

पाली खोपोली राज्य महामार्गावर रस्त्यालगत काही मोठी व जीर्ण झालेली झाडे आहेत. या मार्गावर असलेल्या हेदवली गावाजवळील हातीम कंपनीसमोर तसेच वऱ्हाड गावाजवळ एस्सार पेट्रोलपंप जवळ असलेल्या मोठ्या झाडांच्या मोठ्या फांद्या अर्धवट तुटून लटकत होत्या. एमएसआरडीसीने या लटकणाऱ्या व इतर धोकादायक फांद्या छाटल्या आहेत.

यासंदर्भात पालीतील सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय काटकर यांनी समाज माध्यमातून लक्ष वेधले होते. एमएसआरडीसीने दाखविलेल्या तत्परते बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले, तसेच त्यांनी फांद्या छाटण्यासाठी मदत देखील केली. या मार्गावर प्रवासी व मालवाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू असते. शिवाय मुंबई पुणे येथून कोकणात येजा करणारी अनेक चाकरमानी, वाहने व लोक आहेत. त्यामुळे या मार्गावर सतत रेलचेल सुरू असते. मात्र अशावेळी झाडावरील या तुटलेल्या फांद्या एखाद्या वाहनावर किंवा पादचाऱ्यावर कोसळल्यास मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती.

झाडे व फांद्या तोडण्यासाठी तिथे कामगार गेले होते. पण उंच असलेल्या फांद्यांवर जाऊन त्यांना त्या तोडता आल्या नाहीत. मात्र गुरुवारी मशिनरी पाठवून तुटलेल्या फांद्या व इतर धोकादायक फांद्या तोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे हा मार्ग आता सुरक्षित झाला आहे.

सचिन निफाडे,
उपअभियंता, एमएसआरडीसी
Exit mobile version