जिल्ह्यातील वॉटर स्पोर्ट्सना ब्रेक

सुरक्षितेच्या कारणावरुन 26 मे ते 31 ऑगस्टदरम्यान बंदी
जिल्हा प्रशासनाचे आदेश
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
मालवणच्या तारकर्ली समुद्रकिनारी दोन दिवसांपूर्वी प्रवासी बोट बुडाल्याने दोन पर्यटकांचा हकनाक जीव गेला. दरम्यान, स्कुबा डायव्हिंग करून परत येताना ही दुर्घटना झाली. यावेळी पर्यटकांना लाईफ जॅकेट्स देण्यात आले नव्हते. त्यामुळे आता तारकर्ली समुद्रकिनारी चालवण्यात येणारा वॉटर स्पोर्ट्सचा धंदा किती सुरक्षित आहे? यावर प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. त्याचवेळी रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनार्‍यांवर मोठ्या प्रमाणांवर वॉटर स्पोर्ट्स सुरु आहेत. एक-दोन अपघात वगळता येथील वॉटर स्पोर्ट्सचे चालक सर्व सुरक्षिततेची साधने पुरवित असल्याने पर्यटक सुरक्षित असल्याचे दिसून येते. दरम्यान, पावसाच्या आगमनाच्या धर्तीवर 26 मे ते 31 ऑगस्टदरम्यान किनार्‍यावरील सर्व प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स बंद ठेवण्यात येणार असल्याने या जिल्ह्यातील वॉटर स्पोर्ट्सना ब्रेक लागला आहे.

पावसाचे आगमन होणार असल्याने आणि उन्हाळी सुट्ट्यादेखील संपत येत असल्याने आता पर्यटनालादेखील ओहोटी लागणार आहे. तसेच सुरक्षितेच्या दृष्टीकोनातून प्रशासनाच्या आदेशानुसार आता हे वॉटरस्पोर्ट्स आणि प्रवासी होडी सेवा 31 ऑगस्ट 2022 पर्यंत बंद करण्याचा निर्णय झाला आहे. दरम्यान, या समुद्रकिनारी स्कुबा डायव्हिंगसोबत बनाना राईड्स, जेट स्की, पॅरासिलिंगसारखे साहसी वॉटर स्पोर्ट्स खेळले जातात. सध्या मान्सूनही वेशीवर आल्याने समुद्रामध्ये बदल होत असतात. वार्‍याचाही वेग वाढत असल्याने काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आम्ही पर्यटकांना सर्व प्रकारची सुरक्षिततेची सर्व साधने पुरवून त्यांच्या सुरक्षेची सर्वतोपरी काळजी घेतो. तसेच पाण्यात पोहत असलेल्या पर्यटकांवरदेखील लक्ष ठेवून दुर्घटना घडलीच तर तातडीने वाचवण्याचे कामदेखील जीवरक्षकांच्या माध्यमातून घेत असतो.

– सिद्धेश भगत, वॉटर स्पोर्ट्स संचालक
Exit mobile version