। फ्लोरिडा । वृत्तसंस्था ।
अफगाणिस्तानने मंगळवारी बांगलादेशला पराभूत करीत टी-20 विश्वकरंडकाची उपांत्य फेरी गाठली. प्रतिष्ठेच्या स्पर्धेची उपांत्य फेरी गाठण्याची त्यांची ही पहिलीच वेळ. कोणाच्याही खिजगणतीत नसताना अफगाणिस्तानने ऐतिहासिक कामगिरी केली. याप्रसंगी अफगाणिस्तानचा कर्णधार राशीद खान याने ब्रायन लाराबद्दल आदर व्यक्त करताना म्हटले की, ब्रायन लारा या एकमेव व्यक्तीने आमचा संघ उपांत्य फेरीत पोहोचणार, असे म्हटले होते. त्यानंतर आम्ही ब्रायन लाराला भेटलो, तेव्हा तुमचा विश्वास सार्थ ठरवण्याचा सर्वोत्तम प्रयत्न करू, असे आमच्याकडून त्यांना सांगण्यात आले होते.
राशीद खान पुढे म्हणाला, ब्रायन लारासारख्या महान व्यक्तीने आमच्याबद्दल विश्वास दाखवल्यानंतर खेळाडूंमध्ये नवा उत्साह संचारतो. आम्ही साध्या पद्धतीच्या खेळावर लक्ष केंद्रित केले. काही वेळा आमच्यासमोर आव्हानात्मक स्थिती होती; पण आम्ही दबावाखाली ढेपाळलो नाही. त्यामधून बाहेर आलो.19 वर्षांखालील स्पर्धेत आमच्याकडून चमकदार खेळ झाला होता; पण वरिष्ठ गटाच्या आयसीसी स्पर्धांमध्ये आम्हाला सुपर आठची फेरीही गाठता आली नव्हती. त्यामुळे अफगाणिस्तानचा संघ पहिल्यांदाच उपांत्य फेरीत पोहोचणारी घटना देशवासीयांचा आनंद द्विगुणीत करणारी आहे. तसेच युवा खेळाडूंना प्रेरणा देणारी आहे, असेही राशीद खान म्हणाला.
ब्रायन लाराचा विश्वास सार्थ
