लाचखोर किरण गोरेला अटक

भोगवटादार वर्ग 2 ची जमीन भोगवटादार वर्ग 1 मध्ये करण्यासाठी लाच मागणाऱ्या पनवेल तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक किरण गोरेला 40 हजारांची लाच घेताना गुरुवारी (दि. 14) नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. तक्रारदार जयदास कमलाकर गायकर, रा. गिरवले याच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार जयदास गायकर यांची गिरवले येथे स्वतःच्या मालकीची शेतजमीन आहे.

या शेतजमिनीमधील सर्व्हे नंबर 44 आणि 94/2 मधील त्रुटी दूर करण्यासाठी जयदास याने पनवेल तहसील कार्यालयात 3 जानेवारी 2024 रोजी त्यांच्या वडिलांच्या नावाने सर्व्हे नंबर 44 आणि 94/2 मधील शेतजमिनी भोगवटादार वर्ग 2 मधील जमीन भोगवटादार वर्ग 1 मध्ये वर्ग करण्यात यावा, असा अर्ज केला होता. मात्र, तक्रारी अर्ज करूनदेखील गेले तीन महिने अर्जावर कोणतीही कारवाई झाली नाही. तक्रारदार यांनी महसूल सहाय्यक किरण गोरे यांची यासंदर्भात तब्बल सहा वेळा भेट घेतली. त्यावेळी हे काम करण्यासाठी काही तरी द्यावे लागेल असे सांगत एक लाख 20 हजारांची मागणी केली होती. तडजोडी अंती गोरे यांनी 40 हजारांची मागणी केली.दरम्यान, जयदास यांनी याबाबतची तक्रार नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला केली. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पैसे देताना किरण गोरे याला अटक केली आहे.

Exit mobile version