नवी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
। अलिबाग । प्रतिनिधी ।
तांत्रिक परवाना देण्यासाठी लाच घेणाऱ्या रायगड जिल्ह्यातील पेण येथील महावितरण कार्यालयामधील उप कार्यकारी अभियंता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला. सोमवारी (दि.7) सायंकाळी पाच हजार रुपयाची लाच घेताना त्याला रंगेहाथ पकडण्यात आले.
खालापूरमधील तक्रारदार यांच्या मालकीच्या जागेमधून महावितरण विभागाची उच्च दाबाच्या तीन वाहिन्या गेल्या आहेत. या वाहिन्या एका जागेतून दुसऱ्या जागेवर स्थलांतरित करण्यासाठी शाक्य इंटरप्रायझेस या कंपनीला काम दिले होते. हे काम करून घेण्यासाठी शाक्य एंटरप्राइजेसच्या वतीने तक्रारदारांना अधिकार पत्र दिले होते . या कामाचा तांत्रिक परवाना पेण येथील महावितरण कंपनीच्या कार्यालयात प्रलंबित होता .
तांत्रिक परवाना देण्यासाठी उपकार्यकारी अभियंता संजय जाधव याने तक्रारदार यांच्याकडून पाच हजार रुपयाची लाच मागितली होती. नवी मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सोमवारी (दि. ७)तक्रार करण्यात आली.या घटनेचे गांभीर्य ओळखून पडताळणी करण्यात आली. त्यामध्ये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले.अखेर मंगळवारी (दि.8 ) सायंकाळी पेणमधील महावितरण कंपनीच्या कार्यालयात लाच घेताना संजय जाधव याला रंगेहाथ पकडण्यात आले. याप्रकरणी संजय जाधव यांच्या विरोधात पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उप अधीक्षक धर्मराज सोनके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण कुमार वाघ अधिक तपास करीत आहेत.







