। पनवेल । वार्ताहर ।
खांदेश्वर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अदखलपात्र गुन्ह्याच्या अनुषंगाने प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी एका पेपरविक्रेत्याकडून पाच हजारांची लाच घेणार्या हवालदार लक्ष्मण आत्माराम खंडागळे (47) याला नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी (दि.26) रात्री पकडले. नवीन पनवेल येथे राहणारे रायबा जाधव यांचा पेपरविक्रीचा व्यवसाय आहे. खांदा कॉलनीत दुबे नामक व्यक्तीसोबत जाधवचा पेपर बिल देण्या-घेण्यावरून वाद झाला होता. दुबेने जाधवला धक्काबुक्की करून शिवीगाळ केली होती. या प्रकरणात खांदेश्वर पोलिस ठाण्यात दुबे व जाधव या दोघांनी एकमेकांविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली होती.
हे प्रकरण हवालदार लक्ष्मण आत्माराम खंडागळे यांच्याकडे असल्याने त्यांनी जाधवला बोलवून अटक करण्याची धमकी देत कारवाई टाळण्यासाठी पाच हजारांची लाच मागितली. जाधव यांनी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केल्यावर पथकाने खातरजमा करून मंगळवारी रात्री खंडागळेला लाच घेताना अटक केली.