| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
सुरक्षा रक्षक मंडळातील काम सुरळीत होण्यासाठी सुरक्षा रक्षकाकडे लाच मागणे महागात पडले. नवी मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी (दि.27) छापा टाकून सुरक्षा पर्यवेक्षकाला लाच घेताना रंगेहाथ पकडले. या कारवाईने लाचखोरला दणका मिळाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निलेश तुकाराम बढे असे या आरोपीचे नाव आहे. सुरक्षा रक्षक मंडळामध्ये सुपरवायझर अर्थात सुरक्षा पर्यवेक्षक म्हणून आहेत. एमएसईडीसीएल कोपरखैरणे येथील पर्यवेक्षक (सुपरवायझर) निलेश तुकाराम बढे हे सुरक्षा रक्षकांना ड्युटी लावणे, त्यांचे पॉईंट चेक करणे, त्यांची हजेरी ठेवणे हे काम करतात. काम सुरळीत होण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे प्रतिमहिना शंभर रुपयांची मागणी आरोपी करीत होते. या रक्कमेपैंकी तक्रारदार व त्यांचे इतर दोन सहकारी यांचे एक हजार 900 रुपये बाकी होते. ते दिले नाही तर गैरसोईच्या ठिकाणी बदली करणे,कामावरून काढणे, मंडळाच्या प्रतिक्षा यादीमध्ये टाकणे हा प्रकार आरोपींकडून केला जाणार असल्याची तक्रारदार यांना खात्री झाली. कामे सुरळीत करण्यासाठी मागण्यात आलेल्या लाचप्रकरणी तक्रारदार यांनी नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली. पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके यांनी घटनेचे गांभीर्य ओळखले. शुक्रवारी (दि. 27) पडताळणी केल्यावर लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. अखेर सापळा रचून दुपारी लाच स्विकारताना निलेश बढे यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
लाचखोर सुरक्षा पर्यवेक्षकाला अटक
