2 लाखांची लाच प्रकरणी विशेष सत्र न्यायालयाने केली रवानगी
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
कोळगाव, ता.अलिबाग येथील जमिनीच्या बक्षीस पत्राच्या नोंदीसाठी 2 लाखांची लाच घेणार्या अलिबागच्या तहसिलदार मीनल दळवी यांना आज शनिवारी विशेष सत्र न्यायालयात हजर केले असता विशेष सत्र न्यायाधीश भिंगारे यांनी अधिक चौकशीसाठी त्यांची रवानगी सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई विभागाने शुक्रवारी त्यांच्यावर कारवाई करीत अटक केली होती. त्यानंतर आज एजंट राकेश चव्हाण याच्यासह मीनल दळवी हिला रुग्णालयातून न्यायालयात हजर करण्यात आले.
अलिबागमधील रोहन खोत यांच्या नातेवाईकांच्या कोळगाव येथील जमिनीच्या बक्षिस पत्राचे नोंदणी करण्याचे प्रकरण तहसिलदार कार्यालयाकडे दाखल झाले होते. या बक्षिस पत्राची नोंदीसाठी रोहन खोत यांच्याकडे तहसिलदार मीनल दळवी यांनी तीन लाखांच्या लाचेची मागणी केली होती. तडजोडी अंती ठरविण्यात आलेल्या एजंट राकेश चव्हाण याच्याकडे पैसे देण्यास त्यानुसार शुक्रवारी खोत यांच्याकडून दोन लाख रुपये स्वीकारताना पथकाने राकेश चव्हाण याला रंगेहाथ पकडले. यावेळी त्याने तहसिलदारांचे नाव सांगितल्याने पथकाने तहसिलदारांना गोंधळपाड्यातील निवासस्थानातून ताब्यात घेतले. या अचानकपणे घडलेल्या कारवाईने मीनल दळवी यांना धक्काच बसला त्यामुळे त्यांचा रक्तदाब वाढल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
आज मीनल दळवी हिला तिच्या साथीदारासोबत न्यायालयात हजर करण्यात येणार होते. मात्र सकाळपासून पुन्हा चक्कर येत असल्याने न्यायालयात हजर करण्यास उशीर झाला. अखेर दुपारी दीड वाजता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रुग्णालयातून अलिबाग पोलिस ठाण्यात दोघाही लाचखोरांना आणले. तिथे अटकेची नोंद केल्यानंतर सर्व सोपस्कार पूर्ण करीत न्यायालयात हजर करण्यात आले. शनिवारी सुट्टी असतानाही विशेष सत्र न्यायाधीश अशोक कुमार भिल्लारे यांच्या न्यायालयात सुनावणी घेण्यात आली. यावेळी जिल्हा सरकारी वकील ॲड भूषण साळवी यांनी अधिक चौकशी करण्यासाठी पोलिस कोठडीची मागणी केली. त्यानुसार दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीश भिंगारे यांनी दोघांशी सोमवार पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.