लाचखोर तहसीलदार मीनल दळवीला जामीन मंजूर;साप्ताहिक हजेरी बंधनकारक

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
बक्षिसपत्र निकाल लावण्यासाठी दोन लाखाची लाच आपल्या खासगी एजंटकडून स्वीकारणार्‍या लाचखोर तहसीलदार मीनल दळवींची आज विशेष सत्र न्यायालयाने 25 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर सुटका केली. मात्र परदेशात पळून जाऊ नये म्हणून त्यांचा पासपोर्ट जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आठवड्यातील प्रत्येक सोमवारी त्यांना लाच लुचपत विभागाच्या कार्यालयात हजेरी लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे तपास यंत्रणेवर कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नये, असेही बजावण्यात आले आहे.

मीनल दळवी यांना दोन लाख रुपयांच्या लाचप्रकरणी 11 नोव्हेंबर रोजी नवी मुंबई विभागाच्या लाचलुचपत विभागाने ताब्यात घेऊन अटक केली होती. त्यांच्या सोबत दळवी यांचा एजंट राकेश चव्हाण याला देखील बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. अलिबागच्या न्यायालयात त्यांना 12 नोव्हेंबर रोजी हजर केल्यानंतर न्यायाधीश अशोककुमार भिल्लारे यांनी 14 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत संपल्याने दळवी आणि चव्हाण यांना सोमवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले.

त्यांना न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने दळवी आणि त्यांचा एजंट राकेश चव्हाण याला 28 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले. त्यानंतर आज त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यात आली.

Exit mobile version