अवकाळीने वीटभट्ट्या उद्ध्वस्त

व्यावसायिक हतबल

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील लाल माती आणि वीटभट्टीसाठी लागणारी माती असल्याने या मातीमधून तयार झालेल्या विटांना मोठी मागणी असते. त्यामुळे तालुक्याच्या प्रत्येक भागात वीटभट्टी व्यवसाय स्थानिक शेतकर्‍यांकडून केला जातो. त्यात मे महिन्यात हे वीटभट्टी उत्पादक आपल्या वीटभट्ट्या पेटवत असतात. दरम्यान, अवकाळी पावसाने सलग तीन-चार दिवस जोरदार हजेरी लावल्याने वीटभट्टी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, या व्यवसायासाठी कर्नाटक राज्यातून विटा थापणारे कामगार मजूर आणले जातात, तर काही मजूर हे तालुक्यातील आदिवासी वाड्यांमधील असतात. साधारण एप्रिल आणि मे महिन्यात सर्व वीटभट्ट्यांची उभारणी करून मजूर आपल्या घरी गावी परतत असतात. मात्र, यावर्षी त्या मजुरांचे आणि वीटभट्टी उत्पादक यांचे मोठे नुकसान अवकाळी पावसाने केले आहे. कर्जत वीटभट्टी उत्पादक संघटना यांच्याकडून वीटभट्टी उत्पादकांच्या समस्यांवर चर्चा केली जाते आणि त्यात सर्वात कठीण प्रश्‍न हा महसूल विभागाची रॉयल्टी भरावी लागते आणि त्यावरून महसूल विभागाला चांगला कर मिळतो.

पावसामुळे विटांची पुन्हा माती तयार झाल्याने त्या मजुरांच्या मेहनतीचे पैसे वाया गेले आहेत. तालुक्यातील वीटभट्टी संघटना यांच्याकडून महसूल विभागाला रॉयल्टी भरली जात असल्याने शासनाने आम्हलादेखील नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. वीटभट्टी उत्पादक यांच्याकडून तहसीलदारांना निवेदन देण्यात येणार असून, वीटभट्टी उत्पादकांना भरपाई मिळणार का, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे.

Exit mobile version