अधिकारी-ठेकेदार संगनमताचा संशय गडद
| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील हेटवणे मध्यम प्रकल्पातील पूल साहित्य अपहार प्रकरण दिवसेंदिवस अधिकच गूढ आणि गंभीर बनत चालले आहे. तब्बल 11 पूल गायब झाल्याचे समोर आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणात अधिकारी आणि ठेकेदार यांच्यातील संगनमताचा संशय अधिकच बळावला असून, तपास यंत्रणेलाही अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने अनेक प्रश्न अनुत्तरितच आहेत.
इतक्या मोठ्या प्रमाणात पुल साहित्य हटविणे किंवा अपहार करणे हे कोणाच्याही नकळत होणे शक्य नसल्याची चर्चा सध्या जोर धरत आहे. महाकाय यंत्रसामुग्री, मोठ्या वाहनांची वाहतूक आणि मोठे मनुष्यबळ याशिवाय असा प्रकार घडूच शकत नाही. त्यामुळे हा सर्व प्रकार नियोजनबद्ध पद्धतीने आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या माहितीशिवाय होऊ शकत नसल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कालव्याचे काम करणाऱ्या आर. के. मधानी ॲण्ड कंपनीला 31 डिसेंबर 2025 आणि 13 जानेवारी 2026 रोजी प्रकल्प प्रशासनाकडून पत्र देत पाइपलाइन टाकण्यास अडथळा ठरणारे पूल हटविण्याची परवानगी देण्यात आली होती. त्यामुळे पूल हटविण्याची प्रक्रिया अधिकृत परवानगीनेच सुरू झाली होती का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, या प्रकरणात पोलीस तपासाला आवश्यक कागदपत्रे, तांत्रिक माहिती आणि संबंधित नोंदी वेळेत मिळत नसल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे तपासाची गती मंदावली असून, अनेक महत्त्वाचे धागेदोरे अद्याप अस्पष्ट आहेत.
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, पूल साहित्याचा अपहार डिसेंबर किंवा जानेवारी महिन्यातच झाला असावा; मात्र तक्रार उशिराने दाखल झाल्याने पुरावे गोळा करताना मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. वाहतूक नोंदी, यंत्रसामग्रीचा वापर आणि संबंधितांच्या हालचालींचा तपशील तपास यंत्रणेसाठी महत्त्वाचा ठरत असला, तरी सहकार्याच्या अभावामुळे तपासाला मर्यादा येत असल्याचे बोलले जात आहे. एकूणच, लाखो रुपयांच्या पूल साहित्य अपहार प्रकरणात अधिकारी, ठेकेदार आणि संबंधित यंत्रणांमधील संभाव्य संगनमताचा संशय अधिक गडद होत असून, तपासातील दिरंगाई आणि मिळत नसलेले सहकार्य यामुळे या प्रकरणातील रहस्य आणखी वाढत आहे.
