| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील उल्हास नदीवर असलेला दहिवली-मालेगाव येथील पूल अवजड वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. याबाबत सूचना देणारे फलक सार्वजनिक बांधकाम विभागाने लावले आहेत. दरम्यान, नेरळ गावातून मुरबाडकडे जाणारी अवजड वाहनांची वाहतूक भीमाशंकर राज्यमार्ग रस्त्याने वळविण्याचा निर्णय वाहतूक पोलिसांनी घेतला आहे.
माथेरान-कळंब या राज्यमार्गावरील उल्हास नदीवर असलेल्या दहिवली-मालेगाव येथील पूल बॅरिस्टर ए. आर. अंतुले मुख्यमंत्री असताना बांधण्यात आला होता. हा पुल कमी उंचीचा असल्याने पावसाळ्यात या पुलावरून सातत्याने पाणी जात असते. त्यामुळे हा पूल आता धोकादायक बनला असून या पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आल्यानंतर या पुलाच्या बाजूला नवीन पूल उभारण्याचे काम बांधकाम खात्याने मंजूर केले आहे. 2024 मध्ये 25 कोटीचा निधी देखील मंजूर झाला होता. मात्र, ठेकेदारा कंपनी निश्चित होत नसल्याने या पुलाचे काम लांबणीवर पडले. परंतु; पुलाचे काम यावर्षी सुरू झाले असून वेळेत पूर्ण होऊ शकले नाही.







