स्थानिक शेतकर्यांच्या विरोधामुळे रखडले होते बांधकाम
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील खांडस गावाच्या अलीकडे असलेल्या पुलाचे बांधकाम अर्धवट होते. त्या भागात पाऊस जोरात झाल्याने पुलाखालील नाला दुथडी भरून वाहू लागल्याने खांडस ग्रामस्थांची वाट बंद झाली होती. त्यामुळे ठेकेदाराने रात्रीचा दिवस करीत पुलाचे काम पूर्ण करून घेतले आहे. त्यात तेथे असलेल्या शेतकर्याने पुलाचे बांधकाम रोखून धरल्याने शेवटी ठेकेदाराला पोलिसात तक्रार करावी लागली होती. दरम्यान, पोलिसांनी संबंधित शेतकर्याला सरकारी कामात अडथळा करू नये अशी समज दिल्याने अखेर पुलाचे अर्धवट असलेले काम पूर्ण झाले असून, पुलावरून पायी जाण्याचा मार्ग सुरू झाला आहे.
कशेळे-खांडस राज्यमार्ग रस्त्यावर खांडस गावाच्या अलीकडे असलेल्या पुलाचे बांधकाम सुरू होते. मात्र, त्या पुलाचे बांधकाम तेथील शेतकरी करून देत नव्हता. त्यामुळे पुलाचे काम अर्धवट राहिले आणि शेवटी पावसाळा सुरू झाल्याने पुलाच्या खालून वाहणारा नालादेखील दुथडी भरून वाहू लागला. त्यावेळी खांडस ग्रामस्थांचा त्या नाल्यातून बनविलेला तात्पुरता मार्गदेखील बंद झाला होता. मंगळवारी आणि बुधवारी ही परिस्थिती खांडस गावात निर्माण झाली होती. त्यावेळी गावात जाण्यासाठी कोणताही पर्यायी मार्ग नसल्याने ग्रामस्थांनी शेवटी त्या शेतकर्याची समजूत काढण्याचे प्रयत्न केले.
दरम्यान, स्थानिक शेतकरी कोणाचेही ऐकून घेत नसल्याने शेवटी पुलाचे काम करणार्या ठेकेदाराने नेरळ पोलीस स्टेशन गाठले. दरम्यान, पोलिसांनी पुलाचे काम अडविणार्या शेतकर्याची समजूत काढली. शेवटी सरकारी कामात अडथळा आणण्याचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता निर्माण झाल्याने त्या शेतकर्याने माघार घेतली. त्यानंतर ठेकेदाराने रात्रीदेखील काम करून पुलाचे अर्धवट असलेले बांधकाम पूर्ण केले. सार्वजनिक बांधकाम खात्याने या अर्धवट असलेल्या पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी दाखवलेली तत्परता यामुळे गावात जाण्याचा मार्ग तयार झाला आहे.