महाडमध्ये अतिवृष्टीत पूल पाण्याखाली

पुलांच्या समस्येमुळे दळणवळणाला फटका

। महाड । वार्ताहर ।

अतिवृष्टीमध्ये महाड शहरासह तालुक्यातील अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण होते. पुराबरोबरच सातत्याने नैसर्गिक आपत्तीचे संकट ओढावते. शहरी व ग्रामीण भागात दळणवळणाचे साधन असलेल्या रस्त्यांवरील महत्त्वाचे चार पूल दरवर्षी अतिवृष्टीमध्ये पाण्याखाली जात असल्याने या भागातील जनजीवन सातत्याने विस्कळित होत आहे.

आपत्ती व्यवस्थापनामध्ये रस्ते, पूल अधिक महत्त्वाचे असतानाही आपद्ग्रस्त असलेल्या महाड तालुक्यात अशा पुलांची समस्या अद्यापही कायम आहे. महाड तालुक्यात सावित्री, गांधारी, काळ व नागेश्‍वरी या मुख्य नद्या आहेत. या नद्यांवर अनेक ठिकाणी वाहतुकीसाठी पूल बांधण्यात आले आहेत. पावसाळ्यात नद्यांचे पाणी वाढले की या पुलावरून पाणी जाते आणि वाहतूक व्यवस्था कोलमडते.

महाड शहर हे सावित्री, गांधारी नद्यांच्या किनारी असल्याने पावसाळ्यात दरवर्षी शहरात पुराचे पाणी येते, शिवाय नैसर्गिक आपत्तीचाही धोका बळावतो. अशा आपत्ती परिस्थितीमध्ये मदत कार्यांसाठी रस्ते व पूल सुस्थितीत असणे व बारमाही वापरात असणे महत्त्वाचे आहे, मात्र आपत्कालीन व्यवस्थापनात या महत्त्वाच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष होत आहे. सावित्री नदीवर शहरात असलेला दादली पूल शहराला इतर भागाशी जोडतो. महाड दापोली व मंडणगड, खाडीपट्टा, विन्हेरे या भागांना जोडणारा सावित्रीवरील दादली पूल अतिवृष्टीत पाण्याखाली जात असल्याने शहरातील संपर्क तुटतो. या पुलावरून पुराचे पाणी जात असल्याने शहरात पूर आला की या वाहतूक कोलमडते. पुलाजवळ नवीन पूल बांधण्याचे काम हाती घेण्याची कार्यवाही सुरू आहे.

शहरातून महामार्गाला जोडणारा व कायम वर्दळीचा असलेला गांधारी नदीवरील ब्रिटिशकालीन पूल नेहमीच पाण्याखाली जातो. गतवर्षी हा पूल अवजड वाहतुकीला बंद करण्यात आला होता. शहरात येण्यासाठी हा जवळचा रस्ता आहे. केवळ शहरच नाही तर तालुक्यातील स्थितीही अशीच बिकट आहे. महाड-म्हाप्रळ मार्गावरील नागेश्‍वरी नदीवरील रावढळ पुलाची स्थितीही अनेक वर्षे तशीच आहे. या पुलावरूनही सातत्याने पाणी जात असते. त्यामुळे खाडीपट्टा, दापोली व मंडणगड या दोन तालुक्यामधील वाहतूक व्यवस्थेबरोबरच स्थानिक वाहतूक कोलमडते. याचा परिणाम दैनंदिन कामकाजावर होतो. हा रस्ता आता महामार्ग झाल्याने पूलही नव्याने बांधला जाणार आहे.दुर्गम भागातील मांघरुण-पंदेरी या प्रधानमंत्री सडक योजनेमधील मार्गावर पंदेरीचा कमी उंचीचा पूलही पाण्याखाली जातो.

Exit mobile version