। इंदौर । वृत्तसंस्था ।
रजत पाटीदारने रणजी करंडक स्पर्धेमध्ये हरियाणाविरुद्ध झंझावाती शतक झळकावले आहे. मध्य प्रदेशकडून खेळताना रजतने दुसर्या डावात 102 चेंडूत 159 धावांची खेळी केली आहे. त्याने केवळ षटकार आणि चौकारांच्या जोरावर 20 चेंडूंत 94 धावा ठोकल्या आहेत. रजतने त्याच्या खेळीत 13 चौकार आणि 7 षटकार खेचले असूनअवघ्या 68 चेंडूत शतक झळकावले आहे. हे रणजी स्पर्धेतील चौथे जलद शतक ठरले आहे.
मध्य प्रदेशला पहिल्या डावात 308 धावा करता आल्या. हिमांषू मंत्रीने सर्वाधिक 97 धावा केल्या होत्या. त्याला शुभम शर्मा (44), हरप्रीत सिंग भाटीया (48) यांची साथ मिळाली. प्रत्युत्तरात हरियानाने लक्ष्य दलाल (105), हर्षित राणा (90) व धीरू सिंग (94) यांच्या दमदार खेळीच्या जोरावर 440 धावा केल्या. पहिल्या डावात 15 धावा करणार्या रजतने दुसर्या डावात वादळी फटकेबाजी केली. त्याने 102 चेंडूंत 13 चौकार व 7 षटकारांच्या मदतीने 159 धावा केल्या. हरप्रीतने 44, शुभम शर्माने नाबाद 38 धावांची खेळी केली. सागर सोलंकी ( 32) वेंकटेश अय्यर ( 28) या सलामीवीरांनीही आक्रमक खेळ केला.