गुरुकुलच्या चार खेळाडूंची चमकदार कामगिरी

महाराष्ट्र तायक्वांदोला सांघिक विजेतेपद

| रसायनी | वार्ताहर |

उत्तर प्रदेश कानपुर येथील प्रतिष्ठित द स्पोर्ट्स हब येथे ‌‘इंडिया तायक्वांदो सब-ज्युनियर व कॅडेट राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा 2024-25′ तसेच ‌‘अंतिम चॅम्पियन्स ऑफ चॅम्पियन्स 2024′ (ज्युनियर-क्योरुगी) स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धांचे आयोजन जागतिक तायक्वांदो संघटनेची भारतातील अधिकृत मान्यता असलेल्या ‌‘इंडिया तायक्वांदो’ आणि उत्तर प्रदेश तायक्वांदो यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.

या प्रतिष्ठित स्पर्धेमध्ये गुरुकुल तायक्वांदो अकॅडमीच्या 4 खेळाडूंनी महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करत उल्लेखनीय कामगिरी बजावली. या खेळाडूंनी आपल्या प्रखर कौशल्याने महाराष्ट्राला सांघिक विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. आयोजक उत्तर प्रदेश राज्याने उपविजेतेपद पटकावले तर सिक्कीम संघाने तृतीय क्रमांकाचा चषक उंचावला आहे.

विशेषतः अथर्व साळुंखे याने सब-ज्युनियर वयोगटातील वैयक्तिक स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत कांस्यपदकावर आपले नाव कोरले आहे. तसेच, स्वराली माटेकर, वियोना थेस्मा आणि श्रावणी पाटणे यांनी कॅडेट वयोगटातील मुलींच्या सांघिक स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. ज्यामुळे अकॅडमीसह महाराष्ट्र संघाच्या यशात भर पडली आहे. या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पंच व प्रशिक्षक तुषार सिनलकर यांचे मार्गदर्शन लाभले.

या स्पर्धेत पदक मिळवणारे खेळाडू आता दक्षिण कोरियामध्ये होणाऱ्या ‌‘ज्युनियर जागतिक अजिंक्यपद स्पर्धा 2024′ तसेच हाँगकाँगमध्ये होणाऱ्या ‌‘कॅडेट, ज्युनियर व सिनियर जागतिक पुमसे अजिंक्यपद स्पर्धा 2024′ साठी भारतीय संघाच्या शिबिर व निवड चाचणीसाठी पात्र ठरले आहेत. या खेळाडूंच्या उल्लेखनीय यशाबद्दल इंडिया तायक्वांदोचे अध्यक्ष नामदेव शिरगावकर, असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष अनिल झोडगे, महासचिव संदीप ओंबासे, खजिनदार डॉ. प्रसाद कुलकर्णी, सीईओ गफ्फार पठाण तसेच ठाणे जिल्हा तायक्वांदो संघटनेचे सचिव रोहित जाधव यांनी सर्व पदाधिकारी, खेळाडू, प्रशिक्षक, अकॅडमी व पालकांसोबत या खेळाडूंना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

Exit mobile version