भारतीय महिलांची चमकदार कामगिरी

किवी संघाचा दारूण पराभव; एकदिवसीय मालिकेवर केला कब्जा

। अहमदाबाद । वृत्तसंस्था ।

भारतीय महिला संघ आणि न्यूझीलंड महिला संघ यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना मंगळवारी (दि.29) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय महिला संघाने शानदार विजयाची नोंद करत पाहुण्या संघाचा 6 गडी राखून पराभव केला. स्मृती मंधाना या सामन्याची मानकरी तर दिप्ती शर्मा मालिकेची मानकरी ठरली आहे. यावेळी स्मृतीने विक्रमी शतक झळकावून भारताच्या विजयाचा आनंद द्विगुणित केला. यासह भारताने तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली आहे.

टी-20 विश्‍वचषकातील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताला पराभूत केले होते. यामुळे भारताचे उपांत्य फेरी गाठण्याचे समीकरण फिसकटले होते. पुढे न्यूझीलंडने उपांत्य फेरी गाठली व अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत विजेतेपद पटकावले होते. परंतु, विश्‍वचषकानंतर लगेचच भारत दौर्‍यावर आलेल्या न्यूझीलंड संघाला भारताने पराभवाची धूळ चारली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने न्यूझीलंडचा 59 धावांनी पराभव केला होता. तर, न्यूझीलंडने दुसरा सामना 76 धावांनी जिंकला होता. भारतीय महिला संघाने न्यूझीलंडविरूद्धच्या तिसर्‍या व अंतिम सामन्यात 6 गडी राखून विजय मिळवला व चषकावर आपले नाव कोरले आहे. या सामन्यात स्मृती मानधनाने दमदार ऐतिहासीक शतक शतक ठोकले. तिच्या या शतकामुळे भारताला 5 षटके राखून सामना जिंकता आला.

दरम्यान, न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत भारतासमोर 233 धावांचे आव्हान ठेवले होते. न्यूझीलंडची सुरूवात खराब झाली होती. 25 व्या षटकांपर्यंत न्यूझीलंडने अवघ्या 89 धावा करत 5 गडी गमावले होते. पण, यानंतर ब्रुक हॅलिडेने न्यूझीलंडचा डाव सावरला. हॅलिडेने 96 चेंडूत 9 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने 86 धावांची खेळी केली. न्यूझीलंडच्या 232 धावांच्या खेळीमध्ये जॉर्जिया प्लिमरच्या 39 धावांचेही योगदान आहे. न्युझीलंडने दिलेल्या लक्षाचा पाठलाग करतातना भारताला 16 धावांवर शफाली वर्माच्या (12) रूपाने पहिला धक्का मिळाला होता. पण, पुढे स्मृती व यास्तिका भाटीयाच्या जोडीने दुसर्‍या बळीसाठी 76 धावांची भागीदारी केली. यास्तिका 22 व्या षटकात 35 धावांवर झेलबाद झाली. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार हरमनप्रीत कौरने स्मृतीला साथ देत अर्थशतक ठोकले आणि भारताचा विजय जवळजवळ निश्‍चीत झाला. पुढे स्मृती 122 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने शतकी खेळी करून बाद झाली. यानंतर जेमिमाह रॉड्रिग्सने हरमनप्रीतला 22 धावांची साथ दिली व भारताने 45 व्या षटकात सामना जिंकला. सामन्यात हरमनप्रीतने 59 धावांची नाबाद खेळी केली.

स्मृती मांधनाचे शतक
स्मृतीने या शतकासह एकदिवसीय सामन्यांमधील 8 शतके पुर्ण करत एक नवा विक्रम नोंदवला आहे. स्मृती एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे. यावेळी तिने एकदिवसीय सामन्यांमधील 7 शतके करणार्‍या मिताली राजला मागे टाकले आहे.
Exit mobile version