परिस्थितीवर मात करून उज्ज्वल यश

नांदे वरसोलीतील अनिषा आणि निमिषा दहावी उत्तीर्ण
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
मनात इच्छा असेल तर कठीणातल्या कठीण परिस्थितीवर मात करुन यशाचा डोंगर सर करु शकतो, याची प्रचिती अलिबाग तालुक्यातील नांदे वरसोली विजयनगर येथील अनिषा आणि निमिषा या जिवलग मैत्रिणींच्या यशातून अनुभवायला मिळाली. घरच्या प्रतिकूल परिस्थितीवर दोघींनीही मात करीत 91.20 इतके गुण मिळवून उज्ज्वल यश मिळविले आहे. दोघीही प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या वेश्‍वी गोंधळपाडा येथील माध्यमिक विद्यालयातून तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत.

तालुक्यातील नांदे वरसोली येथील अनिषा महेश पाटील हिने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात दहावीच्या परीक्षेत 91.20 टक्के इतके गुण संपादन करुन उज्ज्वल यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, परीक्षेदरम्यान अनिषा ही शाळेतून येत असताना सायकलवरुन पडली होती. त्यामुळे तिच्या हाताला फ्रॅक्चर झाले होते. अशा अवस्थेतदेखील न डगमगता तिने चांगले गुण संपादन केल्याबद्दल तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. तिची अवस्था पाहून शाळेकडून तिला लेखनिक देण्याची तयारी दाखविण्यात आली होती. मात्र, तिने नकार देत स्वतःच असह्य वेदना सहन करीत परीक्षा देऊन देदीप्यमान असे यश संपादन केले.
अनिषाने प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या वेश्‍वी गोंधळपाडा येथील माध्यमिक विद्यालयातून तृतीय क्रमांक पटकावला आहे. तिचे आईवडील मोलमजुरीचे काम करतात. आई घरकाम करुन घराला हातभार लावण्याचे काम करते. अशा वेळी घरातील कामे उरकून अनिषा पहाटे चार वाजेपर्यंत जागी राहून अभ्यास करीत असे. अनिषाला शास्त्रामध्ये 94, संस्कृतमध्ये 98, मराठीत 83, इंग्रजी 86, गणित 88, तर सामाजिक शास्त्रात 87 इतके गुण मिळाले आहेत. शिक्षिका नूतन ठाकूर आणि रमेश म्हात्रे यांचे मार्गदर्शन, तसेच आईवडिलांचे पाठबळ लाभल्यानेच आपण हे यश संपादन करु शकल्याचे अनिषा आवर्जून सांगते. भविष्यात इंजिनिअर बनण्याचे अनिषाचे स्वप्न आहे.

तालुक्यातील विजयनगर येथील निमिषा गणेश पाटील हिनेदेखील दहावीच्या परीक्षेत 91.20 टक्के इतके गुण मिळवत उज्ज्वल यश संपादन केले आहे. निमिषा हीसुद्धा प्रभाकर पाटील एज्युकेशन सोसायटीच्या वेश्‍वी गोंधळपाडा येथील माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी असून, तिनेदेखील तृतीय क्रमांक पटकावला. तिचे आईवडील मोलमजुरीचे काम करतात. आई घरकाम करुन घराला हातभार लावण्याचे काम करते. अशा वेळी घरातील कामे उरकून निमिषा रात्रभर जागी राहून अभ्यास करीत असे.

तिला शास्त्रामध्ये 86, संस्कृतमध्ये 97, मराठीत 90, इंग्रजी 82, गणित 88 तर सामाजिक शास्त्रात 92 इतके गुण मिळाले आहेत. आपल्या यशात शिक्षिका नूतन ठाकूर आणि रमेश म्हात्रे यांचे मार्गदर्शन तसेच आई वडिलांचे पाठबळ लाभल्यानेच आपण हे यश संपादन करु शकल्याचे निमीषा आवर्जून सांगते. भविष्यात परिचारिका बनून गोरगरिबांची सेवा करण्याचे स्वप्न निमिषा बाळगून आहे.

Exit mobile version