विदर्भाप्रमाणेच कोकणातही समृद्धी आणा- पंडित पाटील

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाप्रमाणेच रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासह कोकणातही रस्त्यांचा विकास करुन येथेही समृद्धी आणा, अशी मागणी माजी आ.पंडित पाटील यांनी व्यक्त केली आहे.

नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 30 हजार कोटींची तरतूद केली होती.त्यावेळी मी विधानसभेत असताना फडणवीस यांना हा निधी कसा काय उपलब्ध करणार अशी विचारणा केली होती.पण फडणवीस यांनी प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर नागपूर- मुंबई समृद्धी महामार्ग निर्माण करुन दाखविला.रविवारी त्याचे लोकार्पणही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करुन विदर्भाच्या विकासाचा नवा महामार्ग खुला केला.त्याबद्दल मी फडणवीस यांचे मनापासून अभिनंदन करतो.त्यांच्या कार्याला सलामही करतो.असे पंडित पाटील यांनी सांगितले.

गेल्या चार वर्षात 701 किलोमीटर समृद्धी महामार्ग तयार होऊ शकतो परंतु वीस वर्ष पुर्ण होऊन देखील मुंबई गोवा महामार्ग होऊ शकत नाही, किती लाजिरवाणी गोष्ट असल्याची खंतही पंडित पाटील यांनी व्यक्त केली. एवढ्या कालावधीत जेवढे शासनकर्ते सतेत राहून गेले त्यांनी सर्वांनी एकत्र येणे ही काळाची गरज बनली आहे. पनवेल ते माणगाव 120 किलोमीटरचा पहिला टप्पा यांना वीस वर्षात शक्य झाले नाही हे आपल्या कोकणचे दुर्दैव आहे,अशी टीकाही त्यांनी केली.

दोन वर्षापूर्वी नितीन गडकरी यांनी कोलाड येथे मुंबई -गोवा महामार्ग पूर्ण करणार असल्याचे जाहीर केले होते.पण आजतागायत हे काम अपूरेच राहिल्याचेही त्यांन निदर्शनास आणले. नितीन गडकरी यांनी संपूर्ण भारतातील रस्ते चकाचक केले परंतु मुंबई – गोवा महामार्ग त्यांना मात्र पूर्ण करता आला नाही. तो महामार्ग भारताच्या बाहेर आहे काय हा मोठा प्रश्‍न सर्वांना पडतोय. कोकणच्या जनतेला कोल्हापूरला वळसा घालून गावाकडे जावे लागतेय. त्यामुळे कोकणी मतदारांनी मतदान करायचे की नाही हे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील जनतेने ठरवायचं आहे अशी संतप्त विचारणाही त्यांनी केली.

पुढील आठवड्यापासून हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. यावेळी कोकणातील सर्वच आमदारांनी आपापसामधील राजकीय मतभेद बाजुला ठेवत केवळ कोकणच्या विकासासाठी एकत्र येणे काळाची गरज आहे,अशी अपेक्षाही पंडित पाटील यांनी व्यक्त केली.

Exit mobile version