| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
आशियाई क्रीडा स्पर्धेच्या ॲथलेटिक्समध्ये पहिल्या दिवशी भारताला फक्त एका कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. महिला गोळाफेकीत किरण बलियानने कांस्यपदक जिंकून भारताचे खाते उघडले. माजी आशियाई विजेत्या मनप्रीत कौरची पाचव्या स्थानावर घसरण झाली.
प्रथमच आंतरराष्ट्रीय पदक मिळविताना किरणने 17.36 मीटर अशी सर्वोत्तम फेक केली. तिने तिसऱ्या प्रयत्नात ही फेक केली. मनप्रीत कौरला मात्र आपल्या सर्वोत्तम कामगिरीच्या आसपासही पोहोचता आले नाही. ती फक्त 16.25 मीटर अशीच कामगिरी करू शकली. सकाळी 20 किलोमीटर चालण्याच्या शर्यतीने ॲथलेटिक्स स्पर्धेला सुरुवात झाली. यात चीनने वर्चस्व गाजविले. पुरुषांच्या शर्यतीत भारताच्या विकाश सिंगला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. तो 1 तास 27 मिनिटे 33 सेकंद अशीच वेळ देऊ शकला. संदीप कुमार कमनशिबी ठरला. त्याला अपात्र ठरविण्यात आले. महिलांच्या शर्यतीतही प्रियांका चमकदार कामगिरी करू शकली नाही. 1 तास 43 मिनिटे 7 सेकंदांत पाचव्या स्थानावर आली.
ऐश्वर्या, अजमल अंतिम फेरीत महाराष्ट्राची असलेल्या ऐश्वर्या मिश्राने महिलांच्या, तर महम्मद अजमलने पुरुषांच्या चारशे मीटर शर्यतीत अंतिम फेरी गाठली. मात्र, आशियाई ज्युनिअर विजेती हिमांशी मलिक आणि ऑलिंपियन महम्मद अनसने निराशा केली.