तीन पिडीतांसह 4 पुरूष ताब्यात
| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील बोरगाव येथे असणाऱ्या सेलिब्रेशन रिसॉर्टवर पेण पोलिसांनी धडक कारवाई करत सात जणांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बोरगाव येथील सेलिब्रेशन रिसॉर्टवर अनैतिक धंदा सुरू असल्याची माहिती पेण पोलिसांना मिळाली होती. परंतु, ठोस माहिती न मिळाल्याने कारवाईस विलंब होत होता. अखेर सोमवारी (दि.23) पोलीस अधिक्षक आंचल दलाल आणि उपविभागीय पोलीस अधिक्षक जालींदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली व पेणचे पोलीस निरिक्षक संदीप बागूल यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार करण्यात आली.रात्री 9.00 वाजण्याच्या सुमारास या दोन्ही पथकांनी सेलिब्रेशन रिसॉर्टवर धाड टाकली. त्यावेळी त्या ठिकाणी कुंटणखाना चालविला जात असल्याचे भयानक सत्य समोर आले. अधिक तपासात त्या ठिकाणी 3 महिलांना त्यांच्या इच्छेविरूद्ध डांबून ठेवल्याचे निदर्शनास आले. तसेच, या प्रकरणात 4 पुरूष देखील पोलीसांच्या हाती लागले. जुल्फिकार जलाल उद्दिन, खगेंद्र कंम्बुमलीक, देवेंद्र पाटील व रविंद्र मलीक असे या चौघांचे नाव असून त्यांनी आर्थीक लाभासाठी तीन महिलांना डांबून ठेवले होते. व त्यांच्याकडून जबरदस्ती वेश्या व्यवसाय करून घेत होते. याप्रकरणी चौघांवर पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना दि.30 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावलीआहे. पुढील तपास पेणचे पोलीस निरिक्षक संदिप बागूल हे करीत आहेत.






