| लातूर | वृत्तसंस्था |
बसने दुचाकीला दिलेल्या धडकेत बहीण, भाऊ व चिमुकल्या भाचीचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना अंबाजोगाई – लातूर मार्गावरील वाघाळा फाट्यावर रविवारी (दि.31) सायंकाळी घडली. बिटरगाव तांडा येथील सेवालाल पंडित राठोड (21) याचा (दि.28) एप्रिलला विवाह होणार होता. लग्नाचाच बस्ता बांधण्यासाठी सेवालाल हा त्याची बहीण दीपाली सुनील जाधव (२०) आणि एक वर्षाची भाची त्रिशा यांना घेऊन दुचाकीने अंबाजोगाईला आला होता. गावाकडे परतत असताना लातूर- छत्रपती संभाजीनगर बसने (एमएच- 24, एयू- 7718) दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यात सेवालाल, दीपाली आणि त्रिशा यांचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच नातेवाइकांनी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात धाव घेऊन आक्रोश केला. सेवालालचे लग्न महिन्यावरच आलेले असताना काळाने त्याच्यावर झडप घातली. या दुर्घटनेमुळे कुटुंबावर शाेककळा परसली.