। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
पायाभूत सुविधांवरील खर्च 10 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढल्याचं त्यांनी सांगितलं. अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या, भांडवली गुंतवणूक 33 टक्क्यांनी वाढवून 10 लाख कोटी रुपये केली जाणार आहे. सरकार रेल्वे क्षेत्रासाठी 2.40 लाख कोटी रुपयांचं भांडवल करणार आहे. 2013-14 च्या अर्थसंकल्पापेक्षा हे नऊ पट अधिक असणार आहे.
रस्ते आणि महामार्ग, रेल्वे, गृहनिर्माण आणि नागरी कामे यासारख्या पायाभूत सुविधांवर विशेष भर दिल्यानं भांडवली खर्च वाढला आहे. त्याचा थेट परिणाम देशाच्या आर्थिक विकासावर होणार आहे.
रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या 2017-18 मध्ये अर्थसंकल्पीय वाटप 59,636 कोटी रुपये त्यानंतर वर्षानुवर्षे त्यात वाढ झाली आणि 2022-23 मध्ये ती 1,99,108 कोटी रुपयांवर पोहोचली. आदल्या दिवशीच्या आर्थिक सर्वेक्षणात सरकारनं राष्ट्रीय महामार्ग आणि रस्त्यांच्या बांधकामात वाढ झाल्याचं सांगितलं. आर्थिक वर्ष 2016 मध्ये 6061 किमीच्या तुलनेत 10,457 किमी राष्ट्रीय महामार्ग/रस्ते आर्थिक वर्ष 2022 मध्ये बांधण्यात आले आहेत.