। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी गुरुवारी अर्थसंकल्प 2024-25 सादर केला. शेतकरी, महिला, तरुण आणि करप्रणालीसंदर्भात सरकारने घेतलेल्या निर्णयांची त्यांनी घोषणा केली. अर्थसंकल्पावर बोलताना निर्मला सीतारामण म्हणाल्या की, वित्तीय तूट 5.1 टक्के राहण्याचा अंदाज आहे. खर्च 44.90 कोटी रुपये असून अंदाजे महसूल 30 लाख कोटी रुपये आहे. 10 वर्षात आयकर संकलनात तीन पट वाढ झाली आहे. 7 लाख रुपये उत्पन्न असलेल्यांवर कोणताही कर भरावा लागणार नाही. 2025-2026 पर्यंत तूट आणखी कमी होईल.
गेल्या 10 वर्षात आम्ही जे काम केलंय त्याच्या भरवशावर आम्हाला पुन्हा संधी मिळेल, देशातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक घरापर्यंत सुविधा कशी मिळेल याबद्दल आम्ही प्रयत्न केले, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी म्हटलं आहे. 2047 पर्यंत भारताला विकसित बनवण्य़ाचा आम्हचा प्रयत्न असून त्या दृष्टीने गेल्या 10 वर्षांपासून प्रयत्न सुरू केलेत. देशातील 25 कोटी जनतेला आम्ही गरिबीच्या खाईतून बाहेर काढण्यास आम्ही यशस्वी ठरलो आहोत, असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
भाषणातील महत्वाचे मुद्दे
- चार कोटी शेतकऱ्यांना पीक विम्याचा फायदा
- डीबीटीच्या माध्यमातून देशातील 38 कोटी लोकांना थेट फायदा झाला.
- स्किल इंडिया मिशन अंतर्गत 1.4 कोटी तरुणांना प्रशिक्षण
- पीएम मुद्रा योजनेंतर्गत 43 कोटी कर्ज दिले, पीएम मुद्रा योजनेंतर्गत 22.5 लाख कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले.
- तरुणांच्या सक्षमीकरणावर भर दिला जात आहे. 3 हजार नवीन आयटीआय उघडण्यात आल्या आहेत. 54 लाख तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
- आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय तरुणांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
- तिहेरी तलाक बेकायदेशीर घोषित करण्यात आला आहे. संसदेत महिलांना आरक्षण देण्यासाठी कायदा आणला आहे.
- पंतप्रधान जन धन योजनेअंतर्गत आदिवासी समाजापर्यंत पोहोचले पाहिजे. खास जमातींसाठी खास योजना आणली आहे. पायाभूत सुविधांच्या विकासाला गती मिळाली आहे. सरकारी योजना लोकांपर्यंत पोहोचत आहेत. सरकार गरिबी हटवण्याचे काम करत आहे. सरकारने आव्हानांचा धैर्याने सामना केला आहे. ग्रामीण विकासाच्या योजना राबविण्यात आल्या आहेत.
- शेतकऱ्यांना सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. 4 कोटी शेतकऱ्यांना पीएम पीक विमा योजनेचा लाभ देण्यात आला आहे. 11.8 कोटी लोकांना पंतप्रधान किसान योजनेतून आर्थिक मदत मिळाली आहे.
- 10 वर्षात उच्च शिक्षण घेणाऱ्या महिलांच्या संख्येत 28 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
- ग्रामीण भागातील 70 टक्के घरे महिलांना देण्यात आली. पीएम आवास अंतर्गत 70 टक्के घरे महिलांना दिली.
- सर्व प्रकारचे पायाभूत प्रकल्प वेळेत पूर्ण होत आहेत.
- येत्या 5 वर्षांत गरिबांसाठी 2 कोटी घरे बांधली जातील, ग्रामीण गृहनिर्माण योजनेंतर्गत 2 कोटी घरे बांधली जातील, मध्यमवर्गीयांसाठी गृहनिर्माण योजनेचा विचार केला जात आहे.
- रूफटॉप सोलर प्लॅन अंतर्गत 1 कोटी घरांना 300 युनिट/महिना मोफत वीज
- अंगणवाडी केंद्राचा दर्जा वाढणार, ‘आशा’ कर्मचाऱ्यांना मिळणार आयुष्मान योजनेचा लाभ.
- गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगासाठी लसीकरण वाढवले जाईल, नॅनो डीएपीचा वापर सर्व क्षेत्रांमध्ये वाढवला जाईल.
- शेतीसाठी आधुनिक साठवण, पुरवठा साखळीवर भर, सरकार मोहरी आणि भुईमूग लागवडीला अधिक प्रोत्साहन देईल, मत्स्यपालन योजनेला चालना देण्यासाठी काम केले जाईल, सागरी खाद्य निर्यात दुप्पट करण्याचे लक्ष्य आहे, सरकार 5 एकात्मिक एक्वा पार्क उघडणार आहे.
