उद्या अर्थसंकल्प सादर होणार

। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।

उद्या, रविवारी 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामन संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 सादर करणार आहेत. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच अर्थसंकल्प रविवारी मांडला जाणार असून, सीतारामन सलग नवव्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे या अर्थसंकल्पाकडे देशाचे लक्ष लागले आहे.

यंदा कृषी क्षेत्राला मोठ्या अपेक्षा आहेत. कृषी बजेट 1.27 लाख कोटींवरून सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता व्यक्त होते. पीएम-किसान, फसल विमा आणि कृषी सिंचाई योजनांना अधिक निधी मिळू शकतो. सेंद्रिय शेती, पशुपालन, मत्स्यपालन, प्रक्रिया उद्योग आणि कोल्ड-चेन सुविधांवर भर दिला जाऊ शकतो. बनावट बियाण्यांवर लगाम घालण्यासाठी नवीन ‌‘बीज बिल‌’ येण्याचीही शक्यता आहे.

पायाभूत सुविधांमध्ये रेल्वेसाठी ‌‘कवच 4.0‌’ सुरक्षा प्रणाली, उर्वरित मार्गांचे विद्युतीकरण आणि मालवाहतुकीतील रेल्वेचा वाढता वाटा यावर लक्ष असू शकते. मध्यमवर्ग आणि पगारदार करदात्यांनाही दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. नवीन कर प्रणालीतील 75 हजार रुपयांची मानक वजावट वाढवून 1 लाख करण्याची मागणी आहे. गृहकर्ज व्याज व वैद्यकीय विम्यासाठी अधिक वजावटीची अपेक्षा आहे. जुनी कर प्रणाली टप्प्याटप्प्याने बंद होण्याबाबतही चर्चा आहे. अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण सकाळी 11 वाजता होईल.

Exit mobile version