पेण तालुक्यातील धोकादायक पूल बांधा- आ.जयंत पाटील

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |

पेण तालुक्यातील धोकादायक पुलांची डागडुजी तथा पुनर्बांधणी केली जावी, अशी मागणी शेकाप आ. जयंत पाटील यांनी विधानपरिषदेत केली आहे.

या संदर्भात उपस्थित केलेल्या लेखी प्रश्‍नांमध्ये त्यांनी विविध मुद्दे उपस्थित करुन सरकारकडे खुलासा करण्याची मागणी केली. यामध्ये पेण तालुक्यातील एकूण 40 मोठ्या पुलांची राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम आणि जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या माध्यमातून सन 2022 च्या पावसाळ्यापूर्वी पाहणी करण्यात आली असून या पाहणी मध्ये नऊ मोठे आणि चार लहान असे तब्बल तेरा पूल धोकादायक असल्याचे निदर्शनास आले आहेत. पाहणीदरम्यान तालुक्यातील 13 पुलांची धोकादायक पूल म्हणून नोंद करण्यात आली असून दोन मोठ्या पुलांचे तर चार लहान पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. त्यापैकी चार लहान पुलांची नुकतीच नव्याने पुनर्बाधणी करण्यात आली असली तरी उर्वरित धोकादायक पूल आगामी पावसाळ्यात त्रासदायक ठरू शकतात, असे त्यांनी सरकारच्या निदर्शनास आणले.

जिल्हापरिषदेच्या अखत्यारीतील नऊ पूल धोकादायक घोषित करण्यात आले आहेत. त्यांच्या पुनर्बांधणीसाठी आणि डागडुजीसाठी रुपये 5 कोटी 20 लाख एवढा खर्च अपेक्षित असून यावर्षी पावसाळ्यापर्यंत सदर धोकादायक पुलांची बांधणी करणे अत्यंत आवश्यक असल्याचे नमूद केले आहे. याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने सदर धोकादायक पुलांची डागडुजी तथा पुनर्बांधणी करण्याबाबत कोणती कार्यवाही व उपाययोजना केली वा करण्यात येत आहे व सदर पुलांची पुनर्बांधणी किती कालावधीत करण्यात येणार आहे, अशी विचारणाही केली आहे.

आ. जयंत पाटील यांच्या लेखी प्रश्‍नावर सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी पेण तालुक्यात पूल धोकादायक असल्याचे मान्य केले आहे. राष्ट्रीय महामार्गवर कोणतेही पूल धोकादायक स्थितीत नाहीत, तथापि, ग्रामविकास विभागाकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार पेण जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या अखत्यारित असलेले 10 पूल त्यांचे विभागाने केलेल्या पहाणीअंती नादुरुस्त असल्याचे निदर्शनास आले आहेत. जिल्हा परिषदेच्या एकूण 10 पुलांपैकी 2 पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट केलेले असून त्यानुसार करण्याचे नियोजन आहे, असे चव्हाण यांनी लेखी उत्तरात नमूद केले आहे.

10 पुलांची पुनर्बांधणी/दुरुस्ती आवश्यक असून त्यासाठी एकूण रुपये 5.45 कोटी एक खर्च अपेक्षित आहे. धोकादायक व नादुरुस्त पुलांची तांत्रिक पाहणी करण्यात आली असून निधी उपलब्धतेनुसार पुनर्बांधणी/ दुरुस्ती करण्याचे नियोजन आहे. अशी माहितीही बांधकाम मंत्र्यांनी दिली आहे.

Exit mobile version