छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणींना उजाळा देत मुलांना मार्गदर्शन
| पनवेल | प्रतिनिधी |
दिवाळीची सुट्टी सुरू होताच मुलांना वेध लागतात ते किल्ले बनविण्याचे. मग त्यासाठी लागणारी माती, किल्ल्यावर ठेवण्यासाठी चिनी मातीचे मावळे, विविध प्रकारचे प्राणी खरेदी करण्याची लगबग दिसून येते. दरम्यान, पनेवल येथील अनुभूती संस्थेने ‘किल्ले बनवा, संघटित व्हा!’ असा अभिनव उपक्रम हाती घेत मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिकवणींना उजाळा देत मार्गदर्शन केले. नुकतीच एक कार्यशाळा पनवेलमध्ये झाली. यावेळी बच्चेकंपनी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
पनवेलमधील अनुभूती या संस्थेचा किल्ले कसे बनवावेत यासंदर्भातील एक ऑनलाईन कार्यशाळा नुकतीच पार पडली. अभ्यासपूर्ण किल्ले कसे बनवावे यासंदर्भात या कार्यशाळेमध्ये माहिती दिली गेली. किल्ल्यांचे प्रकार, आखीव रेखीव प्रमाणबद्ध कसे बनवावेत? सजावट कशी करावी? निसर्ग पूरक वस्तूंचा वापर आणि किल्ल्यांबद्दलची ऐतिहासिक भौगोलिक आणि विशेष माहिती कशी गोळा करावी, याबाबत मार्गदर्शन या कार्यशाळेमध्ये दिले गेले. ऑनलाईन कार्यशाळेसोबतच अनुभूती संस्थेतर्फे काही निवासी सोसायट्यांमध्ये मुलांना एकत्र करून हीच कार्यशाळा मुलांसमक्ष आयोजित केली गेली, ज्यामध्ये मुलांनी आवडीने भाग घेतला.
साधारण 90 च्या दशकाचा काळ असेल आम्ही सगळे जेव्हा शाळेत सहामाही परीक्षा व्हायची आणि त्या नंतरच्या कमीत कमी पंधरा दिवस हे दिवाळीची सुट्टी आम्हाला मिळायची. जशी दिवाळीची सुट्टी सुरू झाली तसा आम्हा सगळ्यांचा एक आवडीचा कार्यक्रम म्हणजे किल्ला बनवणे त्यावेळी लहानपणी किल्ल्यांविषयी आवड निर्माण झाली होतीच; परंतु हे किल्ले दिवाळीतच का बनवले जातात ते कारण मात्र माहित नव्हतं. मात्र जसे जसे मोठे होत गेले तसे तसे अधिक माहिती मिळाल्यानंतर त्याविषयीची सविस्तर लेख वाचला आणि उलगडा झाला महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य पुढे चालू ठेवावे आणि लहान मुलांना आपली संस्कृती किल्ले आणि किल्ल्यांमुळे तयार झालेल्या स्वराज्य याबद्दलची माहिती त्यांच्या कोवळ्या वयातच मिळावी या हेतूने फार पूर्वी कोणीतरी किल्ले बांधायची प्रथा सुरू केली आणि त्याचा खूप चांगला फायदा लहानपणी आम्हाला दिसला, असे सुदीप आठवले यांनी सांगितले.
एक पाच पंचवीस किल्ल्यांच्या पलीकडे आपल्याला किल्ले माहिती नसतात आणि ते माहिती करून घ्यायची इच्छा नाही त्यामुळे ठराविक किल्ल्यांबद्दल माहिती मिळाली त्याचा इतिहास भूगोल जाणून घेतला की आपले काम झाले, असे आजकालच्या मुलांना वाटते. अर्थात यात सर्वतोपरे त्यांची चुकी आहे असेही नाही, असेही आठवले म्हणाले. अनुभूती संस्था पनवेल आणि आसपासच्या परिसरात मुलांना साहस तसेच पर्यावरण जागृतीमधून एक जबाबदार नागरिक बनवण्यासाठी प्रयत्नशील आहे, असेही ते म्हणाले.