| नवी मुंबई | प्रतिनिधी |
राज्यात निवडणुकीचा हंगाम सुरू असून सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासनाने कुठेही गैरव्यवहार होऊ नयेत यासाठी सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. 20 नोव्हेंबर रोजी राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होताच पोलिसांकडून जागोजागी नाकाबंदी करण्यात आली आहे. संशयित वाहनांची कठोरपणे तपासणी करण्यात येत असून अनेक ठिकाणांहून रोकड, मौल्यवान धातू, वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. अशातच ठाणे पोलिसांनी नवी मुंबईतील नेरुळ पोलीस ठाण्याला नेरुळ सेक्टर-16 येथील एका रो-हाऊसमध्ये बांधकाम व्यावसायिकाच्या घरात रोकड असल्याची माहिती मिळाली होती. त्यावरुन पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सदरील रो-हाऊसवर छापा टाकण्यात आला असता एकूण 2 कोटी 60 लाखांची रोकड सापडली. सुमारे अडीच कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली असून सदर कारवाई ही निवडणूक आयोगाने आणि ठाणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई केली असून कोट्यवधी रुपयांची रोकड जप्त केली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नायकवडी यांनी सांगितले की, ”आम्ही एका रो- हाऊसमधून रोकड जप्त केली आहे. साधारण अडीच कोटी रुपयांची ही रोकड आहे. ही जप्त केलेली रोकड कोणाची आहे आणि नवी मुंबईत कुठून आली? याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. निवडणूक आयोग आणि पोलिसांनी संयुक्तपणे ही रक्कम जप्त केली आहे”.