मुरूड शहरातील इमारती धोकादायक

नगरपरिषदेने दिल्या नोटीस

। आगरदांडा । प्रतिनिधी ।

पावसाळा जवळ आल्यामुळे मुरुड-जंजिरा नगरपरिषदेच्यावतीने जीर्ण, मोडकळीस आलेल्या आणि धोकादायक इमारतींची तपासणी करण्यात आली. या केलेल्या सर्वेक्षणात 22 इमारती धोकादायक असल्याचे निदर्शनास आले आसुन या सर्व इमारतीमधील रहिवाशांना महाराष्ट्र नगर परिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमच्या अन्वये या नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यानुसार इमारतीमधील रहिवाशांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याचे निर्देश नगरपरिषदेच्यावतीने देण्यात आले आहे.

यावेळी मुरूड-जंजिरा नगरपरिषद हद्दीतील सर्व मिळकतधारक व रहिवासी यांना आवाहन करण्यात आले की, पावासाळा सुरू होत आहे. या पावसाळी मोसमामध्ये संभाव्य अतिवृष्टी, पुर, वादळ तसेच जमिन खचणे, भुस्खलन, दरडकोसळणे, धोकादायक झाडे इत्यादी नैसर्गिक आपत्तींमुळे होणारी जिवीत व वित्तहानी टाळण्यासाठी ज्या मिळकती-इमारती धोकादायक झाल्या आहेत अशा इमारती अथवा मिळकती मध्ये कोणी ही वास्तव्य करुन नये. तसेच, शेजारच्या रहिवाश्यांची संभाव्य जिवित व वित्तहानी होऊ नये या दृष्टीने धोकादायक इमारती-मिळकतींचा धोकादायक भाग तातडीने उतरून घेऊन धोका नष्ट करावा. धोकादायक घराजवळील धोकादायक झाडांचा योग्यतो बंदोबस्त करुन सहकार्य करावे, असे आवाहन मुरुड जंजिरा नगरपरिषदेच्यावतीने प्रशासक तथा मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी केले आहे.

Exit mobile version